Manisha Koirala: माझा मृत्यू जवळ आलाय.. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये अशी होती मनिषा कोईरालाची अवस्था
Manisha Koirala: मनिषाच्या ही संघर्षाची कहाणी केवळ एका अभिनेत्रीची नाही, तर अत्यंत कठीण परिस्थितीतही आशा न सोडण्याची कहाणी आहे. तिचा हा अनुभव ऐकून चाहत्यांनीही सोशल मीडियावर तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.

Manisha Koirala: बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल पुन्हा एकदा मन मोकळं केलं आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करताना आलेला अनुभव, त्या काळातील भीती आणि प्रचंड एकटेपणाची भावना याबद्दल त्यांनी सांगितलं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आयुष्य संपत असल्यासारखं वाटत होतं, असं ती म्हणाली. तिच्या या आठवणींनी चाहत्यांनाही भावूक केलं आहे. मनिषा कोईरालाला काही वर्षांपूर्वी ओव्हेरियन कॅन्सरचं निदान झालं होतं. आजार चौथ्या स्टेजमध्ये असल्याचं समोर आल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. तिच्यासमोर अचानक मृत्यूचं सावट उभं राहिलं होतं. या काळात मानसिक आणि भावनिक पातळीवर तिने मोठा संघर्ष केला.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतरची पहिली रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयावह रात्रींपैकी एक होती. त्या क्षणी पुढे काय होणार, उपचारांचा काय परिणाम होईल आणि आपण पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य जगू शकू का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते. या काळात तिला प्रचंड एकटेपणाची जाणीव झाली.
सुशांत प्रधानच्या पॉडकास्टमध्ये याविषयी मनिषा म्हणाली, “रुग्णालयातील त्या रात्री, मी एका खोल अंधारात जात आहे, असं मला वाटत होतं. सर्वकाही संपणार आहे, मृत्यू जवळ आला आहे, या भीतीने मी सतत ग्रासले होते. गंभीर आजारातून जात असताना वाटणारी भीती आणि एकटेपणा हा अकल्पनीय असतो. या अनुभवाने मला शिकवलं की आजारपण फक्त शारीरिक वेदनाच देत नाही, तर माणसाला मानसिकदृष्ट्याही एकाकी पाडतं. एकटेपणा हे जीवनाचं कठोर वास्तव आहे. कधीकधी लोकांच्या गर्दीतही माणसाला एकाकी वाटतं.”
View this post on Instagram
कर्करोगावर मात केल्यानंतर मनिषा कोईरालाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण पूर्णपणे बदलला आहे. “जेव्हा आयुष्याने मला पुन्हा जगण्याची संधी दिली, तेव्हा मी माझ्या तत्त्वांशी जुळत नसलेल्या सर्व अनावश्यक गोष्टींपासून स्वत:ला दूर केलं. आजारपणापूर्वी मी माझ्या आरोग्याबाबत खूप निष्काळजीपणे वागत होती. पण आता मी माझं आरोग्य, कुटुंब, निसर्ग आणि देवाप्रती कृतज्ञता यांना प्राधान्य देते”, असं तिने सांगितलं.
कॅन्सरशी लढताना मनिषाचं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. पूर्वी छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचं महत्त्व तिला या काळात नव्याने जाणवलं. मृत्यूची भीती समोर असताना प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे, याची जाणीव तिला झाली.
