
‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन सध्या चांगलाच चर्चेत असून या शोमधील स्पर्धकांची अनेक मुद्यां वरून भांडण होतं असतात तर कधी टास्कदरम्यान काही स्पर्धक एकमेकांशी भिडलेले दिसतात. यावेळीही असाचा एक टास्क देण्यात आला ज्यामध्ये बाहुल्यांरूपी बाळांचं आगमन झालं. त्यांच्या सेवेसाठी बिग बॉसच्या घरात दोन टीम्स पडल्या. एका टीममध्ये अरबाज, जान्हवी, निक्की, घन:श्याम हे होते, तर दुसऱ्या टीममध्ये अंकिता, अभिजीत, वर्षा, निखिल, पंढरीनाथ असे स्पर्धक होते. तर वैभव आणि आर्या या टास्कचे संचालक होते. या टास्कचे काही नियमही होते, त्यानुसार, बाळ नेहमी हातात ठेवलं पाहिजे, ते हातात असेल तेव्हा शांत न बसता त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मात्र त्या टास्कदरम्यान अंकिता वालवलकर ही मालवणी भाषेत बाळाशी बोलत होती. त्यावरूनच नवा वाद सुरू झाला आहे.
मालवणी बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चाहते संतापले
अंकिताने मालवणी भाषेत संवाद साधल्यानंतर संचालक वैभवने तिच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. अरबाज आणि निक्कीने देखील मालवणी भाषा ही मराठी नसल्याचा जावईशोध लावला. वैभवनेही त्यांना सपोर्ट केल्याने चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर यामुळे संतापाचे वातावरण असून एका मराठी अभिनेत्याने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मराठी अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक असलेल्या अभिजीत केळकरनेही यावर आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाला अभिजीत केळकर ?
अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पोस्टही लिहीली आहे. ‘ मालवणी ही मराठी भाषा नाही ? #बौद्धिक दिवाळखोरी’ असा फोटो अभिजीतने शेअर केला असून त्यासोबतच एका पोस्टमधून त्याने या मुद्यावरून टीका केली आहे. ‘ कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत??? हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा, मराठी भाषा वाटत नाही… हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात, ती भाषा, मराठी म्हणून आम्ही चालवून घेतोच आहोत की…’ ‘🙏 देवा म्हाराजा, ह्यांका BiggBossMarathi5 च्या घरातून, हुसकून भायेर काड आनी “मालाडच्या मालवणीत” नेऊन सोड म्हाराजा, व्हय म्हाराजा 🙏’ असं म्हणत अभिजीतने या स्पर्धकांना बाहेर हाकलवा अशी मागणी केली आहे.
तसेच अनेक लोकांनी या वक्तव्याबद्दल अरबाज आणि वैभव यांनी माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे. तर, काही लोकांनी अंकिताला पाठिंबा दर्शवत तू बिनधास्त मालवणी बोल असं म्हटलं आहे.