मराठी अभिनेत्रीला दीड कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगेहाथ; बिल्डरकडून गुन्हा दाखल

गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरण दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकीचं नाव हेमलता पाटकर असून ती मराठी अभिनेत्री असल्याचं कळतंय. दोघींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मराठी अभिनेत्रीला दीड कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगेहाथ; बिल्डरकडून गुन्हा दाखल
दोन महिलांना अटक
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 28, 2025 | 10:05 AM

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पहिल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी अभिनेत्रीविरोधात गुन्हा

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कांदिवली इथल्या रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ ​​हेमलता बाणे (वय 39 वर्षे) आणि सांताक्रूझ इथल्या रहिवासी अमरिना इक्बाल झवेरी उर्फ ​​एलिस उर्फ ​​अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय 33 वर्षे) अशी झाली आहे. हेमलता पाटकर या मराठी अभिनेत्री आहेत. पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, हेमलता पाटकर यांच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323 आणि 504 अंतर्गत यापूर्वीच एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की, त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केले आहेत, याची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली.

तपासात सहकार्य नाही- पोलीस

अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, खंडणीची रक्कम कशी द्यायची होती, याचा तपशीलवार लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, हेमलता पाटकर यांचे हस्ताक्षराचे नमुने अद्याप गोळा करायचे आहेत, तर अमरिना झवेरी यांचे आवाजाचे नमुने घेणेही बाकी आहे. तपास अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, दोन्ही आरोपी महिला तपासात सहकार्य करत नाहीत. आरोपींनी इतर फरार आरोपींसोबत मिळून इतर पीडितांकडूनही खंडणी उकळली असावी, असाही पोलिसांना संशय आहे.

गोरेगाव पश्चिम इथले रहिवासी असलेले तक्रारदार अरविंद गोयल (वय 52 वर्षे), जे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत, यांनी आरोप केला आहे की, आरोपींनी त्यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यात दाखल झालेला फौजदारी खटला मिटवण्यासाठी 10 कोटींची मागणी केली. बिल्डरने याप्रकरणे गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.