सुबोध भावेंसोबत काम करतानाचा अनुभव खास, ‘विजेता’ फेम अभिनेता गौरीश शिपुरकरने व्यक्त केल्या भावना!

अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता गौरीश शिपुरकर, आता 'विजेता' सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

सुबोध भावेंसोबत काम करतानाचा अनुभव खास, ‘विजेता’ फेम अभिनेता गौरीश शिपुरकरने व्यक्त केल्या भावना!
Subodh Bhave-Gaurish

मुंबई : अनेक नाटकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता गौरीश शिपुरकर, आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून गौरीश रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. अभिनेता गौरीश शिपुरकरने सुबोध भावे यांच्यासोबत नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेता गौरीश शिपुरकर विजेता सिनेमाविषयी बोलताना म्हणतो की, ‘कोरोना महामारीमुळे विजेता सिनेमाचे पुन:प्रदर्शन करण्यात येत आहे. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. शिवाय या सिनेमातील सगळेच कलाकार खूप अनुभवी आहेत. सुबोध भावे, पूजा सावंत, माधव देवचके, सुशांत शेलार यांच्यासोबतचे सेटवरचे अनुभव खूप स्पेशल आहेत.’

हे सगळं स्वप्नवत आहे!

अभिनेता गौरीश, सुबोध भावे यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर करताना म्हणाला की, ‘विजेता सिनेमात सुबोध भावे सरांसोबत काम करण्याची संधी मिळणं, हेच माझ्यासाठी खूप खास आहे. ज्यांना तुम्ही लहानपणापासून रंगमंच ते रूपेरी पडद्यावर पाहिलं, ज्यांची नाटकं आणि सिनेमे बघून मी मोठा झालो, त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं, शिवाय विजेता सिनेमाच्या सेटवर त्यांचा अभिनय जवळून अनुभवता येणं, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.’

त्यांनी प्रत्येकवेळी समजावलं!

पुढे तो म्हणतो की, ‘विजेता सिनेमात माझा आणि सुबोध सरांचा एक सोलो सीन आहे. त्यामध्ये मी आणि सुबोध सर आहोत. माझे डायलॉग पाठ होते. पण त्यांच्यासमोर सीन करताना माझे शब्दच फुटत नव्हते. सरांचा अभिनय पाहून मी आजवर शिकत आलो आणि आता त्यांच्यासमोर डायलॉग बोलताना मनात धाकधूक होत होती. मी त्यांना जेव्हा जेव्हा सीनबद्दल विचारत होतो त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. त्यामुळे हा सुंदर प्रवास माझ्या कायम स्मरणात राहील.’

काय आहे कथा?

खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नसल्यामुळे, महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. महाराष्ट्राला जिंकवून देणं हे सौमित्रचं ध्येय असतं. तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो. त्या सर्वांमधील हरवलेला आत्मविश्वास परत आणतो, त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला शिकवतो आणि हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो, हे सर्व ‘विजेता’मध्ये अनुभवू शकाल.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात


Published On - 4:48 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI