
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमियो’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटात नाना पाटेकर, शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, फरीदा जलाल यांच्या भूमिका आहेत. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाची सोशल मीडियावर तेव्हा चर्चा सर्वाधिक होऊ लागली, जेव्हा त्यातून नाना पाटेकर अचानक निघून गेले. नाना इतके नाराज झाले होते की अखेर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना मंचावर स्वत:हून स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘ओ रोमियो’ या चित्रपटात नानांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परंतु ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमातून हे अशा पद्धतीने नाराज होऊ बाहेर पडल्याने त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
नाना पाटेकर यांचा वक्तशीरपणा सर्वांनाच ठाऊक आहे. ते नियोजित वेळेनुसार ‘ओ रोमियो’च्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला पोहोचले होते. परंतु शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांना कार्यक्रमस्थळी यायला एक तास उशीर झाला होता. वेळेचं महत्त्व खूप जपणाऱ्या नानांनी अखेर तिथून काढता पाय घेतला. कार्यक्रमातून नाना निघून जाताच सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली. अखेर विशाल भारद्वाज यांनी मंचावर स्पष्टीकरण दिलं.
लाइव्ह कार्यक्रमात मीडियाशी बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले, “नाना पाटेकर इथून निघून गेले आहेत. तरीसुद्धा मला त्यांच्याबद्दल इथे बोलायचं आहे. नाना हे वर्गातील सर्वांत खोडकर मुलांसारखे आहेत, जे लोकांना त्राससुद्धा देतात आणि लोकांचं सर्वाधिक मनोरंजनसुद्धा करतात. मी त्यांनी गेल्या 27 वर्षांपासून ओळखतोय. परंतु आम्ही पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करतोय. नाना इथे असते, तर मला खूप चांगलं वाटलं असतं. परंतु आम्ही त्यांना एक तास प्रतीक्षा करायला लावली. त्यामुळे ते आपल्या खास अंदाजात उभं राहून इथून निघून गेले. आम्हाला याचं वाईट वाटलं नाही, कारण नाना पाटेकर यांची हीच ओळख आहे.”
“Nana apne signature style me uthe aur kaha ki mujhe 1 ghanta wait karwaya aur chale gaye. Hume bura nahi laga because we know.. That’s what makes #NanaPatekar the Nana Patekar” – #VishalBhardwaj at #ORomeo trailer event pic.twitter.com/9nf8fa3MUR
— $@M (@SAMTHEBESTEST_) January 21, 2026
विशाल भारद्वाज यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी नानांच्या या वागण्याचं समर्थन केलं. ‘मी नानांच्या बाजूने आहे, इथे वेळेची कोणालाच किंमत नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘लक्षात ठेवा, नाना पाटेकर यांनी राजामौली यांचाही चित्रपट नाकारला होता. नानांना स्टारडमने काही फरक पडक नाही. त्यांच्या आत्मसन्मानाचा मी आदर करतो’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.