
प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता दिलजीत दोसांझ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘सरदार जी 3’ या चित्रपटामुळे वादात सापडला आहे. यामागचं कारण म्हणजे, त्याच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची भूमिका आहे. या चित्रपटाचा जेव्हा टीझर प्रदर्शित झाला होता, तेव्हा हानियाचा कुठेच उल्लेख करण्यात आला नव्हता. परंतु ट्रेलरमध्ये आता तिला पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली होती. तरीही दिलजीतने हानियासोबत काम केल्याने, त्यावर जोरदार टीका होत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्याची बाजू घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट लिहित त्यांनी दिलजीतवर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.
‘मी दिलजीतसोबत खंबीरपणे उभा आहे. जुमला पार्टीचं घाणेरड्या कारस्थानाचं विभाग त्याच्यावर निशाणा साधण्याच्या संधीची वाटच पाहत होतं. अखेर ती संधी मिळाली, असं त्यांना वाटतंय. चित्रपटातील कास्टिंगसाठी तो जबाबदार नव्हता, दिग्दर्शक होता. परंतु त्यांना कोणीच ओळखत नाही आणि दिलजीतला संपूर्ण जग ओळखतं. त्याने कास्टचा स्वीकार केला कारण त्याच्या डोक्यात कोणतंही विष नाही,’ असं त्यांनी लिहिलंय. ‘या गुंडांना भारत आणि पाकिस्तानातील लोकांमधील वैयक्तिक संवाद संपवायचा आहे. माझे जवळचे नातेवाईक आणि काही प्रिय मित्र तिथे आहेत. कोणीही मला त्यांना भेटण्यापासून किंवा जेव्हा मला वाटेल तेव्हा त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ‘पाकिस्तानात जा’ असं म्हणणाऱ्यांना माझं उत्तर असेल की ‘कैलाशला जा’’, असंही त्यांनी सुनावलं आहे.
एप्रिलमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतरही हानिया आमिरचा चित्रपटात समावेश असल्याने भारतात दिलजीतच्या या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी होत आहे. अनेक कलाकारांनी दिलजीतवर टीका केली. तर काहींनी त्याचं समर्थनही केलं.
दिलजीतच्या या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा ट्रेलर भारतातून युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. त्याचसोबत हा चित्रपट देशात प्रदर्शित करण्यात आला नाही. 27 जून रोजी हा चित्रपट पाकिस्तानसह इतर देशांमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवाचीही भूमिका आहे. चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या सहभागावर निर्मात्यांनी स्पष्ट केलं की, पहलगाम हल्ल्याच्या आधीच चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. तर वाढता वाद पाहता नीरू बाजवाने तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे सर्व पोस्टर डिलिट केले आहेत.