
आयपीएलच्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या खूप खचला होता. मॅच संपल्यानंतर तो मैदानात हताश होऊन अक्षरश: गुडघ्यांवर बसला होता. हार्दिकच्या या पराभवादरम्यान त्याची पूर्व पत्नी नताशा स्टँकोविकची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा सेल्फी पोस्ट करत त्यावर एक मेसेज लिहिला आहे. नताशाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘माझं हे व्हर्जन (परिवर्तन अशा अर्थाने) नशिबाने आलेलं नाही. सततच्या परिश्रमाने मी इथवर पोहोचले आहे. जेव्हा गोष्टी कठीण होत्या आणि जेव्हा कोणाचंच त्याकडे लक्ष गेलं नाही, तेव्हासुद्धा मी माझ्या या व्हर्जनसाठी खूप मेहनत घेतली आहे. तुम्हीसुद्धा हेच करत असाल तर मी तुमच्या पाठिशी आहे. पुढे चालत राहा’, अशी पोस्ट नताशाने लिहिली आहे. नताशाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘तुला माहितीये का की तू किती प्रेरणादायी आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुला आणखी ताकद मिळो’ असं दुसऱ्याने म्हटलंय.
हार्दिक आणि नताशाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हार्दिक-नताशाने 2020 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. नताशाने 30 जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. मुलगा अगस्त्य आता पाच वर्षांचा असून तो आईसोबत राहतोय.
हार्दिकसोबतच्या घटस्फोटानंतर नताशा एका मुलाखतीत म्हणाली होती, “आयुष्यात सध्या काही घडलं तरी, माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की लोक वाईट नसतात. फक्त त्यांचा आत्मा भरकटतो. मला असं वाटतं की मी स्वत:चं मूल्य विसरले होते. काही परिस्थितीत मी शांत बसायचे, मी फार काही बोलायचे नाही, मला फरक पडत नाही असं मी स्वत:ला म्हणायचे. पण अगस्त्यमुळे मी स्वत:वर प्रेम करायला शिकले.”