मी त्यांच्या विचारांनी प्रभावित… नवाजुद्दीनला साकारायचाय ‘या’ वादग्रस्त आध्यात्मिक गुरुचा रोल
Nawazuddin siddiqui osho role : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अभिनयाच्या जोरावर यशाची मोठी शिखरे सर करत आहे. आता एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या ड्रीम रोलबद्दल सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाला नवाजुद्दीन?

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या एखाद्या चित्रपटामुळे नाही, तर एका खास इच्छेमुळे तो चर्चेत आहे. पडद्यावर कोणत्या खऱ्या व्यक्तीची भूमिका साकारायला आवडेल, असा प्रश्न विचारला असता नवाजुद्दीनने थेट ओशोंचं नाव घेतलं. ओशोंची विचारधारा, व्यक्तिमत्त्व आणि जगण्याची पद्धत आपल्याला आकर्षित करते, असं त्याने सांगितलं.
संधी मिळाली तर ओशोंची भूमिका नक्की साकारायला आवडेल, असं तो म्हणाला. त्याला चित्रपट दिग्दर्शनाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मात्र, दिग्दर्शनात आपल्याला अजिबात रस नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. आपल्याला कायम अभिनेता म्हणूनच काम करायचं असून एक चांगला कलाकार होण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे, असंही त्याने सांगितलं. न्यूज18 च्या रायझिंग भारत समिटमध्ये बोलताना नवाजुद्दीनने ही इच्छा व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाला नवाजुद्दीन?
नवाजुद्दीन यावेळी म्हणाला की, ओशो. त्यांची विचारधारा, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बोलण्याची लकब, त्यांनी स्टाईल, मला प्रचंड आकर्षित करते. त्यामुळे जर मला कधी संधी मिळाली तर मी त्यांची भूमिका आनंदाने साकारायला तयार आहे, असं त्याने म्हटलं आहे. दिग्दर्शन माझ्या आवाक्याबाहेरचे आहे मला त्यामध्ये मुळीच रस नाही त्यामुळे मी तसा कोणताही प्रयत्न करणार नाही, असं स्पष्ट मत यावेळी नवाजने व्यक्त केल.
कोण आहेत ओशो?
ओशो हे एक प्रसिद्ध भारतीय आध्यात्मिक गुरू आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचे खरे नाव चंद्र मोहन जैन होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे झाला. ते भगवान श्री रजनीश या नावानेही ओळखले जायचे. ओशो हे अध्यात्म, ध्यान, प्रेम, नातेसंबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांवरील त्यांच्या शिकवणीसाठी प्रसिद्ध होते. 1974 मध्ये, त्यांनी पुण्यात एक आश्रम स्थापन केला, जिथे जगभरातून अनुयायी येऊ लागले. 1981 मध्ये, ते अमेरिकेत स्थलांतरित झाले, जिथे त्यांच्या अनुयायांनी ओरेगॉनमध्ये रजनीशपुरम कम्यूनची स्थापना केली. जो पुढे वादग्रस्त ठरला. कायदेशीर खटल्यानंतर 1985 मध्ये त्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आणि ते भारतात परतले. 19 जानेवारी 1990 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
