शालिनी परतली..; मालिकेतील हुकमी एक्का, TRP चे विक्रम मोडणार? नव्या मालिकेची जोरदार चर्चा
दोन वेगळ्या मतांचे नुपूर आणि मल्हार जेव्हा कामाच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा नेमकं काय घडतं? त्यांचा प्रवास कसा असेल? याची हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे 'तुझ्या सोबतीने' ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या वर्षात बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘वचन दिले तू मला’, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 4’ या कार्यक्रमांसोबतच आणखी एक नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझ्या सोबतीने’. एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी नुपूर. तिच्या मते सगळेच परिपूर्ण नसतात. जग इम्परफेक्शनच्या तत्वांवर चालतं. तर दुसरीकडे ग्लॅमर, लाईट्स आणि परफेक्शनच्या जगातला सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर. नुपूर आणि मल्हारचं जग जरी वेगळं असलं तरी एकमेकांच्या साथीने ते प्रवास कसा करतात याची गोष्ट म्हणजे ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नव्या वर्षातल्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “आपली नोकरी सांभाळून आपलं घर सुद्धा सांभाळणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्या अवतीभवती दिसतात. त्या कदाचित या गोष्टीचा कधी बाऊ करणार नाहीत पण त्या सुपरवुमन असतात यात कोणताच वाद नाही. ही मालिका नुपूर नावाच्या अशाच एका मुलीची आहे. तिला भेटणारा मल्हार तिच्या या विश्वासाला आणि जिद्दीला पूरक असा सोबती आहे. एकमेकांच्या सोबतीने ते एकमेकांना कसे पूरक ठरतात आणि नियतीने या दोघांचे मार्ग कसे आधीच जोडून ठेवले असतात हे पाहणं फार रंजक ठरेल.”
मालिकेचा प्रोमो-
View this post on Instagram
‘छोटी मालकीण’ या मालिकेनंतर जवळपास 7 वर्षांनंतर एतशा स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना एताशा म्हणाली, “अतिशय सुंदर कथानक आणि आपल्याच घरातील सदस्य वाटावीत अशी मालिकेतली पात्र आहेत. नुपूर ही भूमिका मी साकारत आहे. नुपूरने अगदी लहान वयातच घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण तिने त्याचं कधीही भांडवल केलं नाही. नुपूरच्या हाताला कमालीची चव आहे. घरातल्या साध्या साध्या गोष्टींमधूनही तिला खास पदार्थ बनवता येतात. तिच्या मते फक्त चवच नाही तर पदार्थाचा गंध आणि रंगरुपही तितकंच महत्त्वाचं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणारी नुपूर प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.”
अभिनेता अजिंक्य ननावरे देखील जवळपास 10 वर्षांनंतर स्टार प्रवाहसोबत काम करणार आहे. या मालिकेतली मल्हार ही भूमिका साकारण्यासाठी तो फारच उत्सुक आहे. “‘तू जीवाला गुंतवावे’ मालिकेच्या निमित्ताने मालिका विश्वात झळकण्याची पहिली संधी मला स्टार प्रवाहने दिली होती. पुन्हा एकदा या कुटुंबात येताना अत्यानंद होतोय. नव्या वर्षाची सुरुवात नव्या प्रोजेक्टने होणार आहे. मल्हार लहानपणापासूनच अत्यंत हुशार. घरात नेहमीच त्याचं कौतुक झालंय. आई लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे त्याची चुलत बहीण तायडी त्याचा आधार बनली. मल्हारचं आपल्या कुटुंबावर विशेष करुन तायडीवर प्रचंड प्रेम आहे. तायडी त्याच्यासाठी आईसमान आहे. तो तिच्यासाठी आपला जीवही धोक्यात घालू शकतो. मल्हारला परफेक्शनचं वेड आहे. तो भावनांमध्ये अडकून पडत नाही. गरजवंतांची मदत करतो मात्र कुणालाही कळू न देता. त्याचा प्रेमावर आणि लग्नावर अजिबात विश्वास नाही. अतिशय वेगळं पात्र आहे त्यामुळे साकारताना मजा येणार आहे,” अशी भावना अजिंक्यने व्यक्त केली.
