
Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. पण आता मलायकाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलायका विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, हे प्रकरण 2012 मध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये अभिनेता सैफ अली खान, अमृता अरोराचा पती शकील लडाक आणि त्याचा मित्र बिलाल अमरोही सहभागी होते.
आता या प्रकरणात न्यायालयाने अभिनेत्री मलायका अरोराला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितलं आहे. सोमवारी, मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने मलायकाला शेवटची संधी दिली आणि पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला जाईल, असा इशारा दिला.
समन्स मिळाल्यानंतरही मलायका हजर न राहिल्याने न्यायालयाने यापूर्वी मार्च आणि 8 एप्रिल रोजी मलायकाविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यावेळीही मलायका स्वतः न्यायालयात आली नाही पण तिचे वकील न्यायालयात उपस्थित राहिले.
न्यायालयाने सांगितलं की, कारवाई टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत आणि आता जर मलायका पुढील तारखेला हजर राहिली नाही तर कठोर कारवाई केली जाईल. न्यायालयाने म्हटले, ‘प्रकरणाची माहिती असूनही, मलायका हजर राहत नाही’.
न्यायालयाने सांगितल्यानुसार, ‘जर ती पुढील सुनावणीसाठी हजर राहिली नाही तर, तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने अभिनेत्रविरुद्ध 5 हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला होता आणि 29 एप्रिलपर्यंत रिपोर्ट मागितला होता. आता मलायका हजर राहण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. या प्रकरणात मलायकासोबत तिची बहीण अमृता अरोरा आणि इतरांनाही साक्षीदार बनवण्यात आलं आहे. 2012 मध्ये, हे सर्व लोक दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करत होते.
हे प्रकरण 2012 मधील आहे. जेव्हा सैफ अली खान, करीना कपूर, मलायका अरोरा करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि त्यांचे काही जवळचे मित्र हॉटेलमध्ये डिनर करत होते. तेव्हा हॉटेलमध्ये आलेला उद्योजक इकबाल मीर शर्मा याच्यासोबत अभिनेत्याची भांडणं झाली. सैफवर उद्योजक आणि त्याच्या सासऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शर्माने अभिनेता आणि त्याच्या मित्रांमधील जोरदार वादाचा निषेध केला तेव्हा सैफने त्याला धमकावले आणि नंतर उद्योजकाच्या नाकावर मुक्का मारला ज्यामुळे त्याच्या नाकातून रक्त येवू लागलं.