चुकीच्या हिंदीमुळे ‘या’ अभिनेत्याला मिळाला ब्लॉकबस्टर चित्रपट, एका रात्रीत झाला लोकप्रिय
चुकीची हिंदी बोलल्याने या अभिनेत्याच्या हाती लागला मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट. एका रात्रीत झाला प्रचंड लोकप्रिय. आजही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर करतेय राज्य.

Bollywood Actor : चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करण्यासाठी मुख्य भूमिका मिळणं हे गरजेचं मानलं जातं. कारण नायक किंवा नायिकेची भूमिका कलाकाराला खरी प्रसिद्धी मिळवून देते असा अनेकांचा समज आहे. मात्र, अभिनेता ओमी वैद्यच्या बाबतीत हा समज पूर्णपणे चुकीचा ठरला. तीन मोठ्या सुपरस्टार कलाकारांसोबत असलेल्या चित्रपटात ओमीने केवळ साइड रोल साकारून प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप उमटवली की आजही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘3 Idiots’ मधील चतुर रामलिंगम उर्फ साइलेंसर ही भूमिका ओमी वैद्यची आजही सर्वात मोठी ओळख आहे. या एका भूमिकेमुळे तो रातोरात लोकप्रिय झाला. 10 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस असून, या निमित्ताने त्याच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासावर आपण नजर टाकणार आहोत.
ओमी वैद्यचा जन्म अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झाला. त्याचे बालपण आणि शिक्षणही तिथेच झालं. त्याचे वडील आणि भाऊ दोघेही डॉक्टर होते आणि ओमीनेही डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, ओमीचे मन अभिनयात रमलेलं होतं. त्याच्या डोळ्यांमध्ये अभिनयाची चमक स्पष्ट दिसत होती.
‘3 Idiots’ ने बदललं आयुष्य
ओमीला स्वतःला देखील कधी वाटले नव्हते की एक मोठा हिंदी चित्रपट त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. एका लग्नसमारंभात असताना मित्राच्या सांगण्यावरून त्याने ‘थ्री इडियट्स’साठी ऑडिशन दिलं. विशेष म्हणजे सुरुवातीला त्याला राजू रस्तोगी या भूमिकेसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यांची हिंदी फारशी शुद्ध नसल्यामुळे ऑडिशनमध्ये अडचणी आल्या.
ऑडिशनच्या वेळी त्याला राजू रस्तोगीच्या संवादांचे वाचन करायला सांगण्यात आलं पण शुद्ध हिंदी बोलणं त्यांच्यासाठी कठीण ठरत होतं. त्यामुळे त्याला वाटलं की आपली निवड होणार नाही. मात्र, काही दिवसांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी त्याला पुन्हा बोलावलं आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’च्या स्क्रिप्टमधील संवाद वाचायला दिला.
चुकीची हिंदीच ठरली फायदेशीर
एका मुलाखतीत ओमीने एक मोठा खुलासा केला की, संजय दत्तच्या संवादात ‘इन्साफ’ आणि ‘देश’ हे शब्द होते पण मी ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने वाचले असं त्याने सांगितलं. ते ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागले. मात्र, हाच क्षण त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला.
राजकुमार हिरानी यांना अशाच व्यक्तीची गरज होती ज्याला हिंदी नीट बोलता येत नाही. पण अभिनय जबरदस्त करता येतो. त्यामुळेच ओमीची चतुर रामलिंगम उर्फ साइलेंसर या भूमिकेसाठी निवड झाली.
