Oscars 2023 | ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने रचला इतिहास; पटकावला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’चा पुरस्कार

| Updated on: Mar 13, 2023 | 8:23 AM

आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. ज्यानंतर आता 95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली.

Oscars 2023 | ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने रचला इतिहास; पटकावला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार
The Elephant Whisperers
Image Credit source: Instagram
Follow us on

लॉस एंजेलिस : लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार आपल्या नावे व्हावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. भारताच्या तीन चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं. त्यापैकी भारताच्या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. ‘माझी मातृभूमी, भारताला मी हा पुरस्कार समर्पित करत आहे’, असं दिग्दर्शिका कार्तिकी यावेळी म्हणाल्या. हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट या इतर शॉर्ट फिल्मशी ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ची स्पर्धा होती.

अचित जैन, गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित हा लघुपट 41 मिनिटांचा आहे. या लघुपटात तमिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा अधोरेखित करण्यात आली आहे. दोन अनाथ हत्तींना हे कुटुंब दत्तक घेतं. विशेष म्हणजे कार्तिकी यांचा दिग्दर्शिक म्हणून हा पहिलाच लघुपट आहे.

हे सुद्धा वाचा

“मी पाच वर्षे रघूच्या कथेवर अभ्यास करत होते आणि जवळपास 450 तासांचं फुटेज होतं. रघूच्या अंघोळीचं, जेवतानाचं आणि खेळतानाचं अनेक तासांचं ते फुटेज होतं. पण अशा वेळी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो. तेव्हा कुठे लघुपटासाठी अप्रतिम सीन्स मिळतात. असे जिव्हाळ्याचे क्षण नियोजन करून शूट करता येत नाही”, अशा शब्दांत कार्तिकी यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता.

आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. ज्यानंतर आता 95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली. RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळालं. RRR शिवाय भारताकडून पाठवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला (All That Breathes) बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म विभागात आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला (The Elephant Whisperers) बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात नामांकन मिळालं होतं.