
अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने ‘दहशतवादी’ घोषित केलं आहे. यामागचं कारण म्हणजे सलमानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य. या कार्यक्रमात सलमानने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने एका अधिकृत अधिसूचना जारी करत सलमानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलंय. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी अधिनियमांतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. यासोबतच सलमानचं नाव फोर्थ शेड्युलमध्ये टाकलं आहे. याचा नेमका अर्थ काय असतो आणि पाकिस्तानी पोलीस सलमानला अटक करू शकते का, त्याबद्दल जाणून घेऊयात..
पाकिस्तानच्या 1997 च्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत फोर्थ शेड्युलमध्ये दहशतवादी किंवा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादी आहे. या यादीत समाविष्ट असलेल्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास निर्बंध लादला जातो. त्यांची पाकिस्तानमधील मालमत्ता गोठवली जाते आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवली जाते. परंतु ही देशांतर्गत कायदेशीर तरतूद असल्याने फक्त पाकिस्तानातच हे नियम लागू होतील.
प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात. त्यामुळे पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांना भारतात कोणतेही अधिकार क्षेत्र नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सलमानला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांना भारतीय हद्दीत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही. जरी पाकिस्तानने सलमानविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली, तरी त्याला प्रत्यार्पण करार किंवा परस्पर कायदेशीर सहाय्य कराराची मदत घ्यावी लागेल. परंतु भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही प्रत्यार्पण करार झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध जवळपास अशक्यच आहेत.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, सीमापार अटक केवळ इंटरपोल रेड नोटीससारख्या अधिकृत कायदेशीर यंत्रणेद्वारेच केली जाऊ शकते. ही अटक केवळ दहशतवाद किंवा युद्ध यांसारख्या गंभीर जागतिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्येच केली जाऊ शकते. शिवाय कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विश्वासार्ह आणि ठोस पुरावे सादर करणं आवश्यक आहे. पाकिस्तानने सलमानला जरी दहशतवादी म्हणून घोषित केलं असलं तरी ही कारवाई त्याच्या फक्त वक्तव्यावर आधारित आहे, कोणत्याही गुन्हेगारी कृतीवर नाही.