जगाला हादरवणारी बातमी.. पाकिस्तानने केलं सलमान खानला ‘दहशतवादी’ घोषित; त्या विधानाच्या झोंबल्या मिरच्या
पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तानच्या लोकांसोबत होणारा भेदभाव हे तिथल्या बंडखोरीचं मुख्य कारण आहे. बलुचिस्तान प्रांत हा खनिज संपत्तीने समृद्ध आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या तो पाकिस्तानचा सर्वांत मागासलेला राज्य आहे.

अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. यावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे. आता पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने सलमान खानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमानला फोर्थ शेड्युलमध्ये टाकलं आहे. म्हणजेच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. ही यादी दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत येते आणि त्या यादीतील व्यक्तींवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याप्रकरणी सलमान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
नेमकं काय म्हणाला होता सलमान?
“सध्याच्या घडीला, तुम्ही जर हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे (सौदी अरेबियामध्ये) प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम भाषेत चित्रपट बनवला, तर तो शेकडो कोटींची कमाई करेल. कारण इतर देशांमधून विविध भाषिक लोक इथे मोठ्या प्रमाणात आले आहेत. बलुचिस्ततानमधील लोक आहेत, अफगाणिस्तानातील आहेत, पाकिस्तानातील लोकं आहेत. प्रत्येकजण इथे कामासाठी येतोय”, असं तो म्हणाला होता. बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा उल्लेख केल्याने पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी सलमानच्या वक्तव्याचं कौतुक केलं आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे नेते मीर यार बलोच म्हणाले, “भारतीय अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने 6 कोटी बलुच नागरिकांना आनंद झाला आहे. सलमानने असं काही केलंय, जे प्रमुख देशही करण्यास कचरतात.”
सलमानने जाणूनबुजून बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा केला की अनवधानाने, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या गॅस उत्पादनातही त्याचा 40 टक्के वाटा आहे. या प्रांताचं धोरणात्मक महत्त्व असूनही पाकिस्तानच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रदेशाकडे सतत दुर्लक्ष केलं. यामुळे 1948 मध्ये पाकिस्तानमध्ये सामील झाल्यापासून त्यांची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.
