‘हेरा फेरी 3’मधून बाहेर पडण्याबाबत अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले ‘माझं उत्तर..’

अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच 'हेरा फेरी 3'मधून बाहेर पडण्याबाबत पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर निर्माता अक्षय कुमारने त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.

हेरा फेरी 3मधून बाहेर पडण्याबाबत अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले माझं उत्तर..
Paresh Rawal and Akshay Kumar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2025 | 11:55 AM

‘हेरा फेरी 3’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अभिनेते परेश रावल यांनी अचानक या चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर अक्षय कुमारने त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. आता या सर्व कायदेशीर बाबींवर अखेर परेश रावल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2000 मध्ये ‘हेरा फेरी’ हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे पहिले दोन भाग तुफान गाजले. त्यानंतर आता तिसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. अक्षय कुमार हा ‘हेरा फेरी 3’चा निर्मातासुद्धा आहे. त्यामुळे जेव्हा परेश रावल यांनी माघार घेतली, तेव्हा अक्षयने त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली होती.

आता परेश रावल यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलंय, ‘योग्य कारणांमुळे रद्द झालेला माझा करार आणि (चित्रपटातून) बाहेर पडण्याबाबत माझे वकील अमित नाईक यांनी योग्य उत्तर पाठवलं आहे. त्यांनी माझं उत्तर वाचल्यानंतर सर्व समस्या सुटतील.’ अमित नाईक हे अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांचे केसेस लढण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

शुक्रवारी अक्षय कुमारच्या वकिलांनी परेश रावल यांच्याविरुद्धच्या कायदेशीर कारवाईंबाबतची माहिती दिली. “माझ्या मते त्यांना गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील. अर्थातच त्यांनी माघार घेतल्याने चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. आम्ही त्यांना पत्र लिहून कळवलं आहे की यामुळे कायदेशीर परिणामांना सामारं जावं लागेल. कलाकारांवर, क्रू मेंबर्सवर, लॉजिस्टिक्स उपकरणांवर आणि ट्रेलरच्या शूटिंगवर बराच खर्च झाला आहे”, असं अक्षयच्या वकिलांनी म्हटलंय.

परेश रावल यांनी जानेवारीमध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे ‘हेरा फेरी 3’ या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याबद्दल स्पष्टपणे होकार दिला होता. त्यानंतर ट्रेलरच्या शूटिंगसाठी करार करण्यात आले. खरं तर या चित्रपटाचा सुमारे साडेतीन मिनिटांचा भाग चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर अचानक काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी त्यातून माघार घेतली. या निर्णयामुळे अक्षय कुमार आणि संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला. अक्षयने वकिलांमार्फत परेश रावल यांना सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत दिली होती. त्यानुसार परेश रावल यांनी आता त्यांच्या वकिलांमार्फत उत्तर दिलं आहे. त्यावर आता अक्षय किंवा त्याच्या टीमकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

परेश रावल यांनी चित्रपटाची साईनिंग अमाऊंटसुद्धा परत केल्याचं समजतंय. त्यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी 15 कोटी रुपये मानधन मिळणार होतं. त्यापैकी 11 लाख रुपये साईनिंग अमाऊंट देण्यात आली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, परेश रावल यांनी व्याजासह ही रक्कम परत केली आहे.