40 वर्षांपासून एकटीच, मुलगाही मानत नाही आई; ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीची खंत
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त केल्या. गेल्या चाळीस वर्षांपासून त्या एकट्याच राहत आहेत. कधी काही झालं आणि कोणाला कानोकान खबर लागली नाही तर, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली होती.

दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील त्यांची नकारात्मक भूमिका चांगलीच गाजली होती. नुकत्याच त्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमध्ये झळकल्या होत्या. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. “गेल्या 40 वर्षांपासून मी एकटीच राहतेय आणि माझा मुलगासुद्धा मला आई मानत नाही,” असं त्या म्हणाल्या.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उषा यांनी सांगितलं, “मी एकटीच राहते. मी सकाळी उठून स्वत:साठी खायला काहीतरी बनवते. त्यानंतर देवपूजा करून थोडाफार आराम करते. नंतर माझ्या नातीला व्हिडीओ कॉल करते. मला आता अशा राहण्याची सवय झाली आहे. कारण 1987 पासून मी एकटीच राहतेय. मला जराही भीती वाटत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या इमारतीत राहायला गेले, तेव्हा मला खूप भीती वाटायची. मी सुरक्षारक्षकाला माझ्या दरवाजापर्यंत यायला सांगायची. मागून कोणीतरी हल्ला करेल की काय, अशी भीती वाटायची. परंतु आता मला कशाचीच भीती नाही. मृत्यू कधीही आणि कसाही येऊ शकतो.”
“माझ्या सर्व भाऊ-बहिणींचं निधन झालं आहे. माझ्या एका भावाचं निधन काही दिवसांपूर्वीच झालं. तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होता. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मुलाला फार वेळ देऊ शकली नव्हती. माझ्या आईनेच माझ्या मुलाचं संगोपन केलं. मला जेव्हा कधी वेळ मिळायचा, तेव्हा मी त्याला भेटायला जायची. मराठी नाटकांमध्ये माझा पूर्ण वेळ जायचा. माझा मुलगा आजही मला हेच म्हणतो, की मी त्याला फक्त जन्म दिलाय आणि त्याची खरी आई ही माझी आईच होती”, अशा शब्दांत उषा नाडकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.
79 वर्षीय उषा सध्या मुंबईत एकट्यात राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्या अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी एकटेपणाची भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं. “मी घरात एकटीच राहते. त्यामुळे मला भीती वाटते की कधी कुठे पडले आणि कोणालाच त्याची कानोकान खबर लागली नाही तर? गेल्या वर्षी 30 जून रोजी माझ्या भावाचं निधन झालं. जर त्याला समजलं असतं की मी कोणत्या त्रासातून जातेय, तर तो लगेच धावत माझ्याकडे आला असता. आता मी कोणासोबत या गोष्टी शेअर करू”, असा भावूक सवाल त्यांनी केला होता.
