आता तोंडात हाडं असलेले ते कुत्रे कोण? पियुष मिश्रा यांचा नसीरुद्दीन शाह यांना खरमरीत टोला
अभिनेते पियुष मिश्रा यांनी झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड कलाकारांना लगावलेल्या टोमण्याला सडेतोड उत्तरसुद्धा दिलं आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशभरातील विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. रांचीमध्ये जेपीएससी (JPSC) आणि जेएसएसी (JSSC) भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थी 25 जुलैपासून आंदोलन करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते पियुष मिश्रा यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ‘आरंभ है प्रचंड’ आणि ‘एक बगल में चांद होगा’ यांसारखी गाणी गाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर पियुष मिश्रा यांनी दिग्गज अभिनेते नसीरुद्दी शाह यांच्या एका जुन्या वक्तव्यावरदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?
दिल्लीतच्या सीजेपी आंदोलनादरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडमधील कलाकारांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला होता. ‘जिनके मुंह में हड्डियां होती है, वे बोल नहीं सकते’ (ज्यांच्या तोंडात हाडं असतात, ते बोलू शकत नाहीत) असा टोला त्यांनी मौन बाळगणाऱ्या कलाकारांना लगावला होता. चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी आपला फायदा पाहूनच एखाद्या मुद्द्यावर व्यक्त होतात, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर आता पियुष मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिल्ली आणि झारखंडमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील फरक समजावून सांगितला आहे.
पियुष मिश्रा यांचा जेन-झींना पाठिंबा
पियुष मिश्रा विद्यार्थ्यांना म्हणाले, “तुम्हा सर्वांशी बोलून खूप चांगलं वाटलं. म्हणून मी आज इथे पुन्हा आलो आहे. सरकारचं काम सरकार चालवणं आहे. ते प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचलतात. ते शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हा लोकांनीही शांतता कायम ठेवावी. शिवीगाळ आणि अपशब्दांचा वापर करू नका. अशा बाबतीत मी जुन्या विचारांचा आहे. मला शिवीगाळ अजिबात सहन होत नाही. माझीही दोन मुलं आहेत, जे जेन-झी आहेत. ते राजकारणाबद्दलही जागरूक आहेत.”
नसीरुद्दीन शाह यांना सडेतोड उत्तर
“मी या संपूर्ण प्रकरणात सामील असलेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात नाही. अखेर ते विद्यार्थीच होते. पण तिथे (सीजेपीच्या आंदोलनात) जे घडलं, त्याबद्दल विचार केला पाहिजे. सीजेपीच्या आंदोलनादरम्यान नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, चित्रपटसृष्टी शांत बसली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आवाज उठवत नाहीये. ते म्हणाले होते की, ज्यांच्या तोंडात हाडं आहेत, ते बोलू शकत नाहीत. मी त्यांनी सांगू इच्छितो की.. नसीरुद्दीन शाह.. कृपया मला माफ करा. मी हे अत्यंत आदरपूर्वक म्हणतोय. पण मला विचारायचं आहे की सध्या तोंडात हाडं असलेले ते कुत्रे कोण आहेत? इथे होणारी विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि दिल्ली-मुंबईतील आंदोलनं यात खूप मोठा फरक आहे. इथं आंदोलन करणारे विद्यार्थी पिझ्झा किंवा बर्गर खात नाहीत. ते डाळ-भात खाऊन आंदोलन करत आहेत”, असा टोला पियुश मिश्रा यांनी लगावला आहे.
याविषयी ते पुढे म्हणाले, “तुम्ही पिझ्झा आणि बर्गरच्या हव्यासापोटी शांत बसला आहात की तुम्ही एका विशिष्ट गटाचे सदस्य होता म्हणून? माफ करा नसीर साहेब, मी तुमचा खूप आदर करतो, पण आता मला तुमची भीती वाटत नाही.”