370च्या बिर्याणीच्या बदल्यात GFसोबत शारीरिक संबंध; प्रणित मोरे आधी जोकवर हसला आता मागतोय माफी
Pranit More Controversy: सध्या कॉमेडियन प्रणित मोरे हा चांगलाच चर्चेत आहे. त्याने केलेल्या एका जोकने आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रणितला माफी मागावी लागत आहे.

कलर्स टीव्हीचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 19’ फेम कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका गंभीर वादात अडकला आहे. खरं तर, हे प्रकरण त्याच्या ‘क्राउडवर्क’ (Crowdwork) शोशी संबंधित आहे. या शोमध्ये एका प्रेक्षकाने केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणीवर प्रणितने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडली नाही. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी या कॉमेडियनला धारेवर धरायला सुरुवात केली, ज्यानंतर प्रणितला नाईलाजाने यावर स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागावी लागली आहे.
काय आहे प्रकरण?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे की, प्रणित मोरे त्याच्या शोदरम्यान नेहमीप्रमाणे प्रेक्षकांशी संवाद साधत होता. याच दरम्यान, एका प्रेक्षकाने आपले म्हणणे मांडताना एका महिलेबद्दल अत्यंत असभ्य आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला. शोमध्ये एका व्यक्तीने खुलासा केला की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. त्याने तिला ३७० रुपयांची बिर्याणी खाऊ घातली होती. पण जेव्हा त्या मुलीने त्याला घरी सोडायला सांगितले, तेव्हा त्याने त्या बदल्याच बिर्याणीचे ३७० रुपये वसून करण्याची भाषा वापरली. त्यावेळी प्रणितसारख्या एका जबाबदार कलाकाराकडून अशी अपेक्षा होती की, त्याने अशा वातावरणात त्वरित त्या प्रेक्षकाला विरोध करायला हवा होता. मात्र, प्रणितने हे गांभीर्याने घेण्याऐवजी त्यावर जोरजोरात हसणे पसंत केले. इतकेच नाही तर, त्याने त्या टिप्पणीला ‘पीक गुडगाव कंटेंट’ (Peak Gurgaon Content) असे संबोधून ते सामान्य करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हाच दृष्टिकोन पाहून इंटरनेट युजर्स संतापले.
काय आहे प्रणितचे म्हणणे?
हा वाद वाढत असल्याचे पाहून प्रणितने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक निवेदन (स्टेटमेंट) जारी केले. त्याने आपली चूक कोणतीही लपवाछपवी न करता स्पष्टपणे मान्य केली. प्रणितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “मी हे पूर्णपणे मान्य करतो की त्या लाईव्ह शो दरम्यान माझी प्रतिक्रिया ही माझी ‘लॅप्स इन जजमेंट’ (निर्णय घेण्यातील मोठी चूक) होती. मला त्यावेळी हसण्याऐवजी त्या प्रेक्षकाची टिप्पणी थांबवून त्याला विरोध करायला हवा होता. मी ही परिस्थिती वेगळ्या आणि योग्य प्रकारे हाताळू शकलो असतो.”
प्रणितने हे देखील स्पष्ट केले की, लाईव्ह क्राउडवर्क शोमध्ये कलाकार अनेकदा रिअल-टाईममध्ये प्रतिक्रिया देतात, परंतु हे कोणत्याही प्रकारे महिलांबद्दल अपमानास्पद भाषेचे समर्थन करण्याचे कारण असू शकत नाही. तो म्हणाला, “मी हा फीडबॅक अत्यंत गांभीर्याने घेत आहे. मी एक माणूस आहे आणि सतत शिकत आहे. जेव्हा लोक मला माझ्या चुकीबद्दल जाब विचारतात, तेव्हा त्याने मी लहान होत नाही, उलट मला एक चांगला कॉमेडियन आणि माणूस बनण्यास मदत होते.” त्याने अशीही माहिती दिली की, अशा चुकीच्या विचारांना आणखी प्रोत्साहन मिळू नये म्हणून त्याने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तो व्हिडिओ काढून टाकला आहे.
