‘बिग बॉस 19’नंतर पालटलं प्रणित मोरेचं नशीब! अवघ्या काही मिनिटांत घडली ‘ही’ मोठी गोष्ट, चाहतेही खुश

'बिग बॉस'च्या एकोणिसाव्या सिझनची सांगता झाल्यानंतर कॉमेडियन प्रणित मोरेनं त्याच्या पहिल्या स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांच्या उपस्थितीत या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. याची घोषणा होताच सर्व तिकिट्स विकल्या गेल्या आहेत.

बिग बॉस 19नंतर पालटलं प्रणित मोरेचं नशीब! अवघ्या काही मिनिटांत घडली ही मोठी गोष्ट, चाहतेही खुश
Pranit More
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 15, 2025 | 9:30 AM

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो मध्ये ‘बिग बॉस’. एकतर या शोमध्ये असे सेलिब्रिटी किंवा स्टार्स येतात, ज्यांचं करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरे स्पर्धक असे असतात ज्यांना या शोनंतर प्रचंड प्रसिद्धी मिळते. बिग बॉसमुळे अनेकांचं बुडणारं करिअरसुद्धा सावरलं जातं. सलमान खानच्या या शोने आजवर अनेकांचं नशीब चमकावलं आहे. जो स्पर्धक या शोचा भाग बनतो, त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. ‘बिग बॉस 19’ नुकताच संपुष्टात आला आणि त्यानंतर तान्या मित्तलने तिची पहिली जाहिरात शूट केली. तान्याच्या पाठोपाठ स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेसुद्धा प्रगतीच्या मार्गावर पुढे जाताना दिसतोय.

प्रणित मोरेच्या शोची सर्व तिकिटं विकली गेली

मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं ‘बिग बॉस 19’ संपल्यानंतर त्याच्या स्टँडअप शोची घोषणा केली. हा शो त्याने खास त्याच्या ‘बिग बॉस 19’मधील स्पर्धकांसाठी ठेवला होता. यामध्ये प्रेक्षकही उपस्थित राहू शकत होते. प्रणितच्या या शोच्या तिकिटांची विक्री शनिवारपासून सुरू झाली होती. ‘बुक माय शो’ या तिकिट बुकिंग वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, प्रणितचा शो रविवारी 14 डिसेंबर रोजी ‘द हॅबिटट’ इथं पार पडला.

हा जवळपास दीड तासाचा स्टँडअप कॉमेडी शो होता, ज्याची सर्वांत अनोखी बाब म्हणजे सर्व तिकिटं अवघ्या काही मिनिटांत विकली गेली होती. ऑनलाइन तिकिटांची विक्री सुरू होताच अर्ध्या तासांत सर्व तिकिटं भराभर विकली गेली. खुद्द प्रणितनेच हा शो ‘सोल्ड आऊट’ झाल्याची बातमी इन्स्टा स्टोरीद्वारे चाहत्यांना दिली होती. ‘हा शो लगेचच सोल्ड आऊट झाला. सर्वांचे मनपासून आभार. मी लवकरच टूरची घोषणा करेन. आणखी मोठमोठे शोज आणि आणखी मजा’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती. प्रणितच्या या शोची झलक सोशल मीडियावर पहायला मिळाली. आवेज दरबार, बसीर अली, नेहल चुडासमा, नगमा मिराजकर, गौरव खन्ना यांसह ‘बिग बॉस 19’मधील इतरही स्पर्धक या शोमध्ये उपस्थित होते.

ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला ‘बिग बॉस 19’ 7 डिसेंबर रोजी संपला. अभिनेता गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला. तर प्रणित मोरे तिसऱ्या स्थानी स्पर्धेतून बाद झाला. अंतिम चुरस फरहाना भट्ट आणि गौरव यांच्यात रंगली होती. तर प्रणितलाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं.