
मुंबई | 24 जुलै 2023 : ‘आणीबाणी’ म्हटलं तर अनेक काळ्या आठवणी क्षणात डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण ‘आणीबाणी’ सारखा गंभीर विषय जर विनोदी अंदाजात प्रेक्षणकांच्या भेटीस येणार तर.. ‘आणीबाणी’ मराठी सिनेमा २८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांनी केलं आहे. दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. पण यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आणीबाणी सारखा गंभीर विषय गमतीशीर कसा मांडला? याबद्दल अनेक गोष्टी खुद्द सिनेमच्या टीमने ‘टीव्ही ९ मराठी’ ला सांगितल्या आहेत. शिवाय शुटिंग दरम्यानचे काही किस्से देखील कलाकारांनी सांगितल. सिनेमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा…
आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही एका गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट आहे. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसं बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा सिनेमात मांडण्यात आली आहे.
आणीबाणी सिनेमात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना प्रेक्षकांना एकत्र पाहता येणार आहेत. अभिनेते उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, अभिनेत्री वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.