
खलनायकी भूमिका साकारूनही प्रेक्षकांची मनं जिंकलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीविषयी समजताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. त्याचसोबत ते लवकराच लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. प्रेम चोप्रा यांना डिस्चार्ज मिळाला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांचा जावई आणि अभिनेता शर्मन जोशीने सोशल मीडियावर काही फोटो आणि पोस्ट लिहित आरोग्याविषयीची माहिती दिली आहे. प्रेम चोप्रा यांना गंभीर आर्टिक स्टेनोसिस असल्याचं निदान झाल्याची माहिती शर्मनने दिली.
‘माझे सासरे प्रेम चोप्राजी यांना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि इंटरव्हेंशलन कार्डिओलॉजिस्ट डॉ. रविंदर सिंह राव यांनी दिलेल्या उपचारांबद्दल मी आमच्या कुटुंबाच्या वतीने मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना गंभीर आर्टिक स्टेनोसिस असल्याचं निदान झालं होतं. डॉ. राव यांनी ओपन-हार्ट सर्जरीशिवाय TAVI प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत वॉल्व बदलली. डॉ. गोखले यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या कौशल्यामुळे प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय सुरळीत पार पडली. बाबा आता घरी आले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल आम्ही नेहमीच आभारी राहू,’ असं त्याने लिहिलं आहे.
शर्मनने त्याच्या या इन्स्टा पोस्टमध्ये रुग्णालयातील काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये तो डॉक्टरांसोबत दिसत आहे. एका फोटोमध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रसुद्धा पहायला मिळत आहेत. प्रेम चोप्रा यांना भेटण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते. प्रेम यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासण्यांनंतर त्यांच्या हार्ट प्रॉब्लेमविषयी समजलं.
प्रेम चोप्रा यांना 8 नोव्हेंबर रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते 90 वर्षांचे आहेत. वयोमानानुसार त्यांना आरोग्याच्या इतरही काही समस्या आहेत. प्रेम चोप्रा हे इंडस्ट्रीतील सर्वांत ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. जवळपास सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलंय. तब्बल 380 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.