प्रियंका चोप्राच्या चित्रपटाला ऑस्करचं नामांकन; 9 वर्षांच्या मुलीच्या कथेनं सर्वांची मन जिंकली
भारतीय चित्रपटाची ऑस्करमध्ये एन्ट्री झाली आहे.प्रियंका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांच्या निर्मित याच्या एका चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी नामांकन मिळाले आहे. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. चित्रपटातील दोन बहिणींची कथा सर्वांनाच भावली.

भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्कर पुरस्कार 2025 साठी जगभरातील चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आलीये. यामध्ये भारतीय चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे.
भारतीय चित्रपटाची ऑस्करमध्ये एन्ट्री
ऑस्करमध्ये एन्ट्री घेतलेला हा भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित ‘ आहे. या चित्रपटाचे नाव ‘अनुजा’ असं असून लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत चित्रपटाने आपले स्थान निर्माण केले आहे. ‘अनुजा’ चित्रपटात 9 वर्षांच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲडम जे. ग्रेव्हज यांनी केले आहे. हा एक भारतीय-अमेरिकन चित्रपट आहे.
काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे हे नामांकन पुढे ढकलण्यात आले होते, परंतु आता ते गुरुवारी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी हे 17 जानेवारीला जाहीर होणार होते.
View this post on Instagram
चित्रपटाची कथा काय आहे?
या चित्रपटाची कथा एका 9 वर्षांच्या मुलीची आहे. या मुलीला एक मोठी बहीण असते जिला कारखान्यात काम करणे आणि अभ्यास करणे यापैकी एक निवडणे भाग पडते. तिला बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्याची सुवर्णसंधी मिळते. ‘अनुजा’साठी हा एक निर्णय असतो जो तिचे आणि तिच्या बहिणीचे आयुष्य बदलून टाकू शकणार असतो. यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडतं यावर हा चित्रपट आधारित आहे.
‘अनुजा’ने अनेक पुरस्कार जिंकले
दरम्यान या चित्रपटातील ‘अनुजा’ची भूमिका 9 वर्षांची मुलगी सजदा पठाण हिने साकारली आहे. सजदाने यापूर्वी 2023 मध्ये आलेल्या ‘द ब्रेड’ या चित्रपटात देखील काम केले आहे. तर, अनन्या शानभागने ‘अनुजा’ चित्रपटात सजदा पठाणच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे. यासोबतच या शॉर्ट फिल्ममध्ये नागेश भोसले आणि गुलशन वालिया देखील आहेत.
‘अनुजा’ ने आतापर्यंत न्यूयॉर्क शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024, हॉलिवूड शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट लाइव्ह इन ॲक्शन फिल्म आणि मॉन्ट क्लेअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्कर्स पुरस्कार सोहळा हा 2 मार्च 2025 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉनन ओब्रायन करणार आहेत.