
पुण्यातील बालगंधर्व येथे ‘पप्पा सांगा कुणाचे‘ या सिनेमाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. या प्रीमिअरला शरद पवार, नाना पाटेकर,जब्बार पटेल, हर्षवर्धन पाटील,मोहन आगशे उपस्थित होते. दरम्यान, नाना पाटेकर यांनी सिनेमाविषयी बोलताना जब्बार पटेल यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप केला. त्यावर जब्बार पटेल यांनी देखील उत्तर देत आरोप फेटाळले.
काय म्हणाले नाना?
नानांनी सरनाईकांच्या आठवणींना उजाऴा दिला. ते म्हणाले, ‘सरनाईक अगदी सहजगतीने अभिनय करायचे. नाहीतर हल्ली नट सहजतेची एवढी अँक्टिग करतात की ते त्या भूमिकेत शिरतच नाहीत. नटसम्राट साकारतानाचे अश्रु वेगळे हो…पण शेतकऱ्यावा बघताना डोळ्यात पाणी येत नाही हो…कारण सगळंच सुकून गेलंय… जब्बारला मी लब्बाड पटेल म्हणतो… त्याने मला सिंहासन तेवढ्या एकाच चित्रपटात घेतलं. त्यातही मानधनातले 2 हजार दिलेच नाहीत…(गंमतीने) परत जब्बारने मला त्याच्या एकाही सिनेमात घेतलच नाही… कारण त्याच्यासाठी तोच अनुभव दांडगा असावा..‘
वाचा: सकाळी किती वाजता उठणे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर? जाणून घ्या विज्ञान काय सांगते
जब्बार पटेलांनी दिले चांगले उत्तर
नानांचे बोलणे ऐकून जब्बार पटेल यांनी उत्तर दिले. ‘हा थापा मारतो… मी पैसे दिलेलेत त्याचे तेव्हाच… आणि समजा बाकी राहिले असतील तर ते मला तरी आठवत नाही… नाना उगीच आपली सभा मारून न्यायची म्हणून तो असे काही बोलत असतो… जाऊद्या…‘ असे जब्बार पटेल म्हणाले.
मानले शरद पवार यांचे आभार
सिंहासन या सिनेमासाठी जब्बार पटेल आणि नाना यांनी एकत्र काम केले होते. या सिनेमाविषयी बोलताना जब्बार यांनी शरद पवार यांचे आभार मानले. ‘सिंहासन हा सिनेमा बनवण्यात शरद पवारांचा खूप मोठा वाटा आहे. कारण पवारांनीच त्यावेळी आम्हाला शुटिंगसाठी खरंखुरं मंञालय उपलब्ध करून दिलं होतं…म्हणूनच हा सिहांसन हा अजरामर सिनेमा तयार होऊ शकलाय. या सिनेमासाठी मंत्र्यांचे बंगले देखील शुटिंगला आम्हाला पवारांनीच उपलब्ध करून दिले तेही मोफत… हे फक्त पवारच करू शकतात‘ असे जब्बार पटेल म्हणाले.