AI च्या मदतीने बदलला ‘रांझना’चा क्लायमॅक्स, व्हिडीओ तुफान व्हायरल; भडकले दिग्दर्शक
'रांझना' या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलं आहे. परंतु यात एक ट्विस्ट आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापराने 'रांझना'च्या क्लायमॅक्सला बदलण्यात आला आहे. नव्या क्लायमॅक्ससह हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आला.

धनुष आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रांझना’ हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात कुंदन नावाचा एक तरुण जोया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होतात आणि अखेर त्याचं प्रेमच त्याचा जीव घेतो. परंतु सध्या थिएटरमध्ये जो ‘रांझना’ चित्रपट सुरू आहे, त्याच्यात मोठा बदल करण्यात आला आहे.
AI ने बदलला ‘रांझना’चा क्लायमॅक्स
या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘Ambikapathy’. या चित्रपटाचा क्लायमॅक्स एआयच्या मदतीने बदलण्यात आला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने हा बदल करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी हा नवीन बदल असलेला चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नव्या व्हर्जनमध्ये मृत्यूच्या दारात उभा असलेला कुंदन त्याचे डोळे उघडतो आणि उठून बसतो. त्याचे मित्र बिंदिया (स्वरा भास्कर) आणि मुरारी (झीशान अयुब) त्याला पाहून आनंदाने रडू लागतात. या चित्रपटाचा शेवट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Al-altered happy ending of Raanjhanaa. pic.twitter.com/1C954pEoTH
— The Cinéprism (@TheCineprism) August 1, 2025
हाच व्हिडीओ चित्रपटाच्या दिग्दर्शकांपर्यंत पोहोचला आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी चित्रपटाच्या नव्या क्लायमॅक्सविषयी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘आज एआयने बनवलेल्या ‘रांझना’चं नवीन व्हर्जन पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कुंदन जिवंत झाला आहे. या चित्रपटाच्या शेवटाला दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटाला आपल्या रक्ताने, संगीताने, कवितांनी आणि वेदनेनं बनवणाऱ्यांच्या मर्जीविरोधात बदलण्यात आला आहे.’
View this post on Instagram
याआधीच्या एका पोस्टमध्ये आनंद यांनी लिहिलं होतं, ‘गेले तीन आठवडे खूप विचित्र आणि खूप त्रासदायक होते. रांझना या चित्रपटाचा जन्म विचार, संघर्ष आणि क्रिएटिव्ह रिस्कने झाला होता. या सर्व गोष्टींची जाणीव न ठेवता आणि आमच्या मर्जीशिवाय त्याचा शेवट बदलून पुन्हा प्रदर्शित होताना पाहून मला उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय. यामध्ये सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे हे सर्व खूप आरामात झालं आहे.’ एखादा चित्रपट घडवण्यामागे असंख्य लोकांची मेहनत आणि कल्पना असते. ‘रांझना’चा शेवटच मनाला भिडणारा होता. परंतु एआयच्या मदतीने तो शेवटच बदलल्याने दिग्दर्शकांना वाईट वाटणं अत्यंत साहजिक आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अनेकांनी त्यांची साथ दिली आहे.
