
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाने एक नवीन इतिहास रचला आहे. बॉक्स ऑफिसवर दररोज हा चित्रपट कमाईचे नवीन उच्चांक नोंदवत आहे. धुरधंर चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं आहे. अगदी छोट्यात छोट्या कलाकारानेही वेगळी ओळख मिळवली आहे. अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाची कथा आणि त्यात अभिनय करणाऱ्या कलाकारांचं कौतुक करताना थकत नाहीयत. या चित्रपटात एक पात्र आहे जमील जमाली. जमील जमाली हे पात्र एका पाकिस्तानी राजकारण्याचं आहे. या रोलने चित्रपट सृष्टीतून बाजूला फेकल्या गेलेल्या एका कलाकाराला ओळख मिळवून दिली आहे. त्यांचं नाव आहे राकेश बेदी.
धुरंधर चित्रपटाचं यश पाहून आज राकेश बेदी यांच्या डोळ्यात पाणी आहे. चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी धुरंधरच्या यशानंतर राकेश बेदी यांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाब्रा यांनी राकेश बेदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. “मी 49 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करतोय. पण मला कधी स्टार असल्यासारखं वाटलं नाही. जे आज वाटतय. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं“ असं मुकेश छाब्रा म्हणाले. मुकेश छाब्रा यांनी धुरंधरसाठी कलाकारांची निवड केली होती.
पार्ट 1 पार्ट 2 सुद्धा येणार
राकेश बेदी यांनी रंगवलेल्या जमील जमाली या पात्राला अनेक शेड्स आहेत. वरवर हे पात्र विनोदी वाटत असलं तरी राजकारण्यांमधील निष्ठुरता, एका मुलीचा बाप या सगळ्या भावनांना त्यांनी उत्तम न्याय दिला आहे. जमील जमाली हा कराचीमधल्या रेहमान डकैत गँगचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असतो. पण रणवीर सिंह (हमजा) हा जमील जमालीच्या मुलीला आपल्या प्रेमात पाडतो. त्यानंतर रणवीर सिंह जमील जमालीला रेहमान डकैतच्या विरोधात जाऊन स्वत:च्या बाजूने कशा पद्धतीने वळवतो ते या चित्रपटात दाखवलं आहे. धुरंधरचा पार्ट 1 आला आहे. अजून पार्ट 2 बाकी आहे. पार्ट 2 मध्ये जमील जमालीचा रोल आणखी मोठा आणि महत्वाचा असू शकतो. या चित्रपटाच्या यशाचं सर्व श्रेय दिग्दर्शक आदित्य धरला आहे.