Sanjay Raut : जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार, संजय राऊत यांचे जिव्हारी लागणारे शब्द
Sanjay Raut : "हा माझा डायलॉग नाही, जयवंत दळवी यांच्या नाटकातलं सुंदर वाक्य आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर महाराष्ट्रात भाजपं याच भूमिकेत आहे" अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊत यांनी केली.

“काल प्रथमच आपण पाहिलं की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं. दोन धुरंधर एकत्र आले. मुलाखत देणारे आणि घेणारे सुद्धा आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राची मुलाखत म्हटली आहे. महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत, महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मत व्यक्त केली. खणखणीतपणे ते बोलले आहेत” असं खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले. “भाजपने जे अधिकारी नेमलेले आहेत, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था, प्रशासनात ते मराठीच आहेत. मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे. त्या डेथ वॉरंटवर सही मराठी माणसाची आहे. हे भाजपच कसब आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री फिरत आहेत. अजित पवार फिरतायत, भाजपला शिव्या घालत फिरत आहेत. तरी ते सरकारमध्ये आहेत. काल त्यांना सावरकरांवर मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलं. अरे सावरकर विरोधी आहेत, तर त्यांना ठेवता कशाला सरकारमध्ये?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “आम्ही सावरकरांचा विचार सोडला म्हणता ना, मग वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता मंत्री घेऊन सरकारमध्ये बसलेला आहे. तुम्ही कसले पोकळ सल्ले देत आहात” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
आता हिरवे नाही का झालात?
“भाजप दुतोंडी गांडूळ आहे. सावरकरांच्या विचारांना नाही मानत ना, मग दूर करा त्यांना. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला आहे. फडणवीस-ओवेसी भाई-भाई. अंबरनाथमध्ये काँग्रेस-भाजप एकत्र आले, आत हिरवे नाही का झाले? मीरा-भाईंदर, अंबरनाथमध्ये ओवेसी, काँग्रेस यांच्याबरोबर निकाह लागलेला आहे. आता हिरवे नाही का झालात? दुतोंडी गांडूळ त्या पद्धतीने भाजपचं राजकारण सुरु आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
त्यांना भारत काँग्रेस मुक्त करायचा होता
“मुस्लिम मतांसाठी एमआयएमचा थेट पाठिंबा घेत आहात. अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एमआयएमसोबत भाजपची छुपी युती आहे. काही ठिकाणी उघड आहे” असं राऊत म्हणाले. त्यावर पत्रकारांनी त्यांना काँग्रेसने सुद्धा भाजपसोबत युती केली, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर “चुकीचचं आहे ते. मी दोघांविषयी बोलतोय. मला आश्चर्य भाजपचं वाटतं. त्यांना भारत काँग्रेस मुक्त करायचा होता”
जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर
“महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपात सहभागी करुन घेतली. उर्वरित ठिकाणी एमआयएम बरोबर युती केली. भाजपला कोणीही चालतं. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे” अशी टीका राऊत यांनी केली.
