‘धुरंधर’च्या यशानंतर तो बदलला..; म्हणताच जमील जमालीने डेव्हिड धवन यांना दिलं सडेतोड उत्तर

'धुरंधर' या चित्रपटाच्या यशानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते डेव्हिड धवन यांनी एका मुलाखतीत अभिनेते राकेश बेदी यांच्याबद्दल एक टिप्पणी केली होती. 'राकेश बेदी यांची चाल बदलली आहे' असं ते म्हणाले होते. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धुरंधरच्या यशानंतर तो बदलला..; म्हणताच जमील जमालीने डेव्हिड धवन यांना दिलं सडेतोड उत्तर
Rakesh Bedi and David Dhawan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2026 | 11:57 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांमध्ये जमील जमालीची भूमिका साकारल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांची लोकप्रियता तुफान वाढली आहे. या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी राकेश बेदींबद्दल एक टिप्पणी केली होती. चित्रपटाच्या यशानंतर त्यांचं वागणं बदलल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या टिप्पणीवर आता राकेश बेदी यांनी उत्तर दिलं आहे. राकेश आणि डेव्हिड हे दोघं FTII मध्ये बॅचमेट्स होते. या दोघांची मैत्री खूप जुनी आहे. परंतु डेव्हिड धवन यांची अशी टिप्पणी राकेश बेदी यांना रुचली नाही.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदी म्हणाले, “कोण बदललंय आणि कोण नाही याबद्दल मी फार विचार करत नाही. लोक बदलतात आणि ते ठीक आहे. मला माहीत आहे की मी कोण आहे? मी माझ्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे मीसुद्धा अशा काळातून गेलोय जेव्हा माझ्याकडे कोणतंही काम नव्हतं आणि मी नुसता बसून होतो. खऱ्या आयुष्यात मी त्यापेक्षा अधिक समस्यांचा सामना केला आहे. परंतु अशा कोणत्याच टिप्पण्यांचा किंवा वक्तव्यांचा माझ्यावर फार परिणाम होत नाही.”

“आयुष्यात वाईट काळ असो किंवा गोष्टी चांगल्या चालत असो.. मी प्रत्येक परिस्थितीत एकसारखाच राहायचा प्रयत्न करतो. मी यश किंवा अपयशाला स्वत:ला बदलू देत नाही. नुकत्यात एका मुलाखतीत डेव्हिड धवन म्हणाले की, राकेशचं तर वागणंच बदललं आहे. जरी कोणी असं म्हटलं असेल की मी बदललोय, तर मला खरंच असं वाटतं की मी अजूनही तीच व्यक्ती आहे, जी मी आधी होतो”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

डेव्हिड धवन यांनी काही दिवसांपूर्वी ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांची आणि राकेश बेदी यांची मैत्री 50 वर्षे जुनी आहे. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये राकेश बेदी यांनी काम केलंय. पुढे ‘धुरंधर’च्या यशानंतर राकेश बेदी यांच्या वागणुकीत बदल झाल्याचं म्हणत त्यांनी टिप्पणी केली की, “तुम्ही त्याच्यातील चमक आणि त्याच्या चालण्याबोलण्याची पद्धत पाहू शकता. मित्रा तुझी चाल बदलली आहे, असं आम्ही सतत बोलत असतो. तो माझा वर्गमित्र आहे. एफटीआयआयमध्ये आमची रॅगिंगसुद्धा व्हायची. हे सर्व कमाल आहे.”

‘धुरंधर’मध्ये राकेश बेदी यांनी साकारलेल्या जमील जमाली या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. त्यांच्या अभिनयकौशल्याची इंडस्ट्रीतल्या अनेकांनी प्रशंसा केली.

Follow Us