गुन्हा दाखल होताच रेमो डिसूझा आणि लीझेल यांनी पत्रकार परिषद घेत केला मोठा खुलासा
प्रसिद्ध डान्स कोच रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल यांच्यावर 11.96 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. याबाबत सोशल मीडिया आणि मीडियामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याने रेमो डिसूझा याने पत्रकार परिषदे घेत याबाबत सर्व खुलासा केलाय. आपल्या विरोधात हे सगळं एकतर्फी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुप्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझेल डिसूझा यांच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता दोघांनी ही पत्रकार परिषदेत घेत आपली बाजू मांडली आहे. महाराष्ट्रातील एका डान्स ग्रुपने रेमो आणि त्याची पत्नी यांच्या विरुद्ध 11.96 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. सोशल मीडियावर आपले मत मांडल्यानंतर रेमोने पत्नीसह पत्रकार परिषद घेतली आणि सर्व खुलासा केला. पत्रकार परिषदेपूर्वीच रेमोने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपले स्पष्टीकरण दिले आहे. या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी तपास यंत्रणांना सहकार्य करण्याबाबत सांगितले.
रेमो डिसूझाला या प्रकरणी सत्य काय आहे असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, ‘मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की मी तुम्हाला अशा प्रकारे भेटेन, परंतु आम्हाला काहीतरी स्पष्ट करायचे आहे. तुम्ही ऐकलेले सर्व काही एकतर्फी आहे. सोशल मीडियावर ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत, त्याच्याशी लीझेल आणि माझा काहीही संबंध नाही.
रेमो पुढे म्हणाला की, ‘मला खूप खेद वाटतो की, सत्य जाणून न घेता आणि तथ्य तपासल्याशिवाय मीडियामध्ये आमची नावे आली. म्हणजे 11 कोटी 96 लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी कोणीही इतर लोकांबद्दल काही ऐकले नाही आणि त्यांची सत्यता तपासली नाही. यात थेट आमचं नाव घेतलं.
View this post on Instagram
तो म्हणाला की, ‘हे प्रकरण WeUnbeatable नावाच्या ग्रुपचे आहे, जो माझ्या शो डान्स प्लस सीझन 4 मध्ये आला होता. तो तिथे सहभागी झाल्यापासून मी त्याला ओळखतो. हे लोक स्पर्धक म्हणून तिथे आले होते. त्यांनी नृत्य केले आणि येथून या लोकांनी नाव कमावले.
एका पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘अनेक मीडिया रिपोर्ट्सद्वारे आम्हाला कळले आहे की आमच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही एका डान्स ग्रुपची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. मला सांगताना अत्यंत खेद वाटतो की अशा बातम्या आमच्याबद्दल प्रसिद्ध होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करू इच्छितो की या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या अत्यंत खोट्या बातम्या आहेत आणि लोक आमच्याबद्दल अफवा पसरवत आहेत.
अहवालानुसार, रेमो-लिजेल डिसूझा आणि इतर काही जणांविरुद्ध मुंबईतील मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी कलम 465 (बनावट), 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार डान्सर ग्रुपने आरोप केला आहे की रेमो डिसूझा, त्याची पत्नी लीझेल आणि इतरांनी 2018 ते जुलै 2024 दरम्यान त्यांची फसवणूक केली आहे.