‘टॉक्सिक’च्या त्या न्यूड सीनवर आक्षेप, ऋषिका सिंहचा यशला थेट इशारा, म्हणाली ‘…तर कर्नाटकातून बाहेर काढू’
‘टॉक्सिक’च्या ट्रेलरवर कन्नड अभिनेत्री ऋषिका सिंह नाराज; यशला दिला थेट इशारा, म्हणाली, ‘महिलांचा सन्मान नसेल तर कर्नाटकातून बाहेर काढू’.

कन्नड अभिनेता यशच्या आगामी ‘टॉक्सिक’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत असतानाच आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. कन्नड अभिनेत्री ऋषिका सिंहने ट्रेलरमध्ये महिलांचे करण्यात आलेले चित्रण आणि काही बोल्ड सीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने चित्रपटातील महिला पात्रांना योग्य आणि सन्मानजनक पद्धतीने दाखवण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.
ऋषिका सिंहने यशला थेट प्रश्न विचारत, कर्नाटकातील एका मोठ्या अभिनेत्याने अशा प्रकारच्या दृश्यांना मंजुरी का दिली, असा सवाल केला. यश विवाहित असून त्याला मुलं आहेत, याची आठवण करून देत तिने महिलांशी सन्मानाने वागण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
‘महिलांना योग्य पद्धतीने दाखवलं का?’
रिशिकाच्या मते, ‘टॉक्सिक’सारखा मोठा कन्नड चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावा अशी तिची इच्छा आहे. चित्रपटात बॉलिवूडमधील अभिनेत्री काम करत असल्याचा आनंद असल्याचेही तिने सांगितले. मात्र, ट्रेलरमध्ये महिलांना ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ते तिला अजिबात आवडले नाही.
चित्रपटात पाच प्रमुख महिला कलाकार असल्याचे सांगत ऋषिका सिंहने प्रश्न उपस्थित केला की, ट्रेलरमध्ये यापैकी एकाही महिला पात्राला सुंदर किंवा कौतुकास्पद पद्धतीने दाखवण्यात आले आहे का? पुरुषांच्या अहंकाराला अधिक महत्त्व देण्यात आले आहे का, असा सवालही तिने केला.
कियारा आडवाणीच्या पात्रावरही सवाल
ऋषिका सिंहने ट्रेलरमधील एका संवादाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये एका महिलेचा ‘रेट’ विचारला जातो. या संवादावर आक्षेप घेत तिने विशेषतः कियारा आडवाणीच्या पात्राचा उल्लेख केला.
‘कियारा आडवाणीला बॉलिवूडमधून आणून अशा पद्धतीने का दाखवण्यात आले?’ असा सवाल तिने उपस्थित केला. तसेच, एखाद्या दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या पत्नींबद्दल अशाच प्रकारची टिप्पणी केली गेली असती तर यशचे चाहते कशी प्रतिक्रिया दिली असती याचाही विचार करण्यास तिने सांगितले.
‘महिलांचा सन्मान नसेल तर कर्नाटकातून बाहेर काढू’
ऋषिका सिंहने आपल्या व्हिडीओच्या शेवटी यशला कठोर शब्दांत इशारा दिला. महिलांचा सन्मान केला गेला नाही, तर कर्नाटकातून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते असे तिने म्हटले. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
