‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटसाठी मिळत नव्हती जागा; रितेश देशमुखने फडणवीसांना फोन केला अन्..

अभिनेता रितेश देशमुखने नुकत्याच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी केलेल्या मदतीचा किस्साही रितेशने यावेळी सांगितला.

राजा शिवाजी सिनेमाच्या सेटसाठी मिळत नव्हती जागा; रितेश देशमुखने फडणवीसांना फोन केला अन्..
Riteish Deshmukh and Devendra Fadnavis
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2026 | 12:49 PM

अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगभरात तब्बल 120 कोटी रुपयांहून कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. गेल्या दहा वर्षांपासून रितेश या चित्रपटासाठी मेहनत करत होता. अखेर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. मात्र ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बनवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. यादरम्यान त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. सुरुवातीला रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते, मात्र काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यानंतर नागराज मंजुळेंनी हा प्रोजेक्ट हाती घेतला, परंतु तेव्हाही काही अडथळे आले. अखेर रितेशनेच दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शूटिंगदरम्यान एक सेट उभारण्यासाठी रितेशला जागा मिळत नव्हती. याबाबतचा किस्सा त्याने नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितला. यावेळी रितेशने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

एका पुरस्कार सोहळ्यात रितेश म्हणाला, “राजा शिवाजी या चित्रपटाचं जेव्हा शूटिंग सुरू होतं, तेव्हा मला एक सेट उभारण्यासाठी जागाच मिळत नव्हती. मी त्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कुठेच जागा उपलब्ध होत नव्हती. अखेर एके ठिकाणी मनासारखी जागा मिळाली, पण ती सरकारची असल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला होता. कारण ती जागा ज्या दराने हिंदी चित्रपटांना मिळते, ते दर आम्हाला परवडणारे नव्हते. तेव्हा फडणवीस साहेबांनी मला आश्वासन दिलं की तुम्ही महाराजांवर चित्रपट बनवत आहात, तर उद्या सकाळी ती जागा तुम्हाला उपलब्ध असेल. या मदतीसाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”

रितेशने मानले फडणवीसांचे आभार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या 24 दिवसांत या चित्रपटाने भारतात 101.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाईने ओपनिंग करण्याचा, ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करण्याचा आणि एका दिवसातील मराठीतील सर्वाधिक कमाई करण्याचाही विक्रम आपल्या नावे केला आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us