कितने आदमी थे… शोलेतल्या गब्बरला मीच शिकवलं, सचिन पिळगांवकरांनी सांगितलं फेमस डायलॉगचा जन्म कसा झाला?
सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'शोले' सिनेमातील किस्सा सांगितला आहे. त्यांनी कितने आदमी थे या प्रसिद्ध डायलॉगमागील किस्सा सांगितला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते म्हणून सचिन पिळगांवकर ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. हिंदी सह मराठी सिनेमांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बालिका वधू’, ‘पारध’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘बचपन’, ‘अशीही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेष म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील हिट सिनेमा ‘शोले’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता त्यांनी शोलेमधील ‘कितने आदमी थे’ या प्रसिद्ध डायलॉगचा जन्म कसा झाला हे सांगितले आहे.
‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा डायलॉग आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. अमजद खान यांच्या गब्बर सिंग या पात्राने आणि त्यांच्या भारदस्त आवाजाने या डायलॉगला अमरत्व प्राप्त झाले. पण, या डायलॉगमागे सचिन पिळगांवकर यांची मेहनत आणि मार्गदर्शन असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.
वाचा: अश्लील फोटो आणि व्हिडीओ विकून दोन महिन्यात कमावले 10 कोटी, कोण आहे ही अभिनेत्री?
नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी ‘शोले’मधील या डायलॉगच्या निर्मितीमागील रंजक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, अमजद खान यांना हा डायलॉग सुरुवातीला योग्य रीतीने बोलता येत नव्हता. त्यांचा आवाज पातळ वाटत होता आणि या डायलॉगसाठी भारदस्त व खर्जातील आवाजाची गरज होती. यासाठी सचिन पिळगांवकर यांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेले आणि त्यांना डायलॉग बोलण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
सचिन पिळगांवकर म्हणाले, “शोले चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेकांना वाटले की, अमजदचा आवाज गब्बर सिंगच्या पात्राला शोभत नाही. तो थोडा पातळ वाटत होता. मी त्याला माइकसमोर उभे केले. तेव्हा आमचे रेकॉर्डिस्ट सूद आणि त्यांचे असिस्टंट मंगेश देसाई यांना मी सांगितले, ‘ट्रेबल पूर्णपणे बंद करा आणि बेस वाढवा.’ त्याचबरोबर मी अमजदला सांगितले, ‘माइकच्या जवळ उभा राहा आणि वरच्या पट्टीत बोलू नको, खालच्या पट्टीत बोल.’ कारण मला माझ्या गायनाच्या अनुभवामुळे ऑक्टेव्हज्चे ज्ञान आहे. मी त्याला सांगितले, ‘खालच्या सुरात बोल… कितने आदमी थे…’ त्याने आधी हा डायलॉग वरच्या पट्टीत ओरडून म्हटला होता, पण मी त्याला खालच्या सुरात बोलायला सांगितले.”
सचिन पिळगांवकर यांच्या या मार्गदर्शनामुळे अमजद खान यांनी तो डायलॉग इतक्या प्रभावीपणे सादर केला की, तो ‘शोले’ चित्रपटाचा प्राणच बनला. सचिन यांच्या अनुभव आणि कौशल्यामुळे हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
