
Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अलियान उर्फ विजय दास असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. विजय दास याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कशी अटक करण्यात आली, पोलिसांनी कसा सापळा रचला याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून मध्यरात्री ३ च्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय दासला ठाण्याच्या लेबर कॅम्पजवळील जंगलातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साईटजवळ हे लेबर कॅम्प आहे. तब्बल २०० जण असलेल्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हा आरोपी शर्ट बदलत पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांकडून सातत्याने त्याचे लोकेशन ट्रेस केले जात होते. अखेर काल रात्री ठाण्यातील लेबर कॅम्प भागात त्याचे लोकेशन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी लेबर कॅम्पजवळील जंगलाच्या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले. यावेळी आरोपीने लपण्यासाठी अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं. अखेर वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून त्याला अटक करण्यात आली आहे.ॉ
मोहम्मद अलियान उर्फ विजय दास याला अटक केल्यानंतर त्याने सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची कबुली दिली आहे. यानतंर त्याला मध्यरात्री चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली. चेंबूरनंतर आरोपीला पहाटे ४ वाजता खार पोलिसांत आणण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ही शोध मोहिम सुरु होती. अखेर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. सैफ अली खानच्या घरात आरोपी कसा घुसला? आरोपींचा हेतू काय होता? या कामात त्याला साथ देणारा दुसरा कोणी आहे का? त्याने आणखी किती बॉलिवूड कलाकारांच्या घराची रेकी केली आहे? सैफच्या घरी जाण्याचा त्याचा उद्देश काय होता? त्याला कोणाला टार्गेट करायचा होते? ज्यांच्या मदतीने आरोपी सैफच्या घरी पोहोचला तो कोण आहे? असे अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. आज पोलीस चौकशीदरम्यान याप्रकरणाची उत्तर शोधणार आहेत.