बापरे! हल्लेखोराला पुन्हा सैफच्या घरी घेऊन जाणार पोलिस; क्राइम सीन पुन्हा घडणार
सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आणि नंतर मुंबई न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. आता पोलिस आरोपीला सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा घेऊन जाण्याची शक्यता आहे. नक्की क्राइम सीनवर काय आणि कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी पोलिस असा निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे.

सैफ अली खानच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला ही घटना आताही तेवढीच अनपेक्षित आणि धक्कादायक वाटतेय. चाकू हल्ल्यात सैफ जखमी झाला असून अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहे. आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिस कसून चौकशी करत आहेत. पण याच चौकशीचा भाग म्हणून पोलिस या आरोपीला पुन्हा एकदा सैफच्या घरी घेऊन जाऊ शकतात. जेणेकरून क्राइम सीन रिक्रिएट करता येईल.
पोलिस हल्लेखोराला सैफच्या घरी परत का घेऊन जाणार?
सुमारे तीन दिवस मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांना चकमा दिल्यानंतर अखेर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यात आले. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आणि नंतर मुंबई न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. आता पोलिस आरोपीला सैफ अली खानच्या घरी घेऊन जाण्याचा विचार करत आहेत.
आरोपीकडून क्राइम सीन रिक्रिएट करण्याची शक्यता आहे कारण असे अनेक प्रश्न आताही उपस्थित होत आहेत त्यांची उत्तरे कदाचित या क्राइम सीन रिक्रिएट केल्यानंतर मिळू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, सोमवारी शरीफुलला सैफ अली खानच्या घरी म्हणजेच सतगुरु शरण बिल्डिंगमध्ये नेले जाऊ शकते. याशिवाय त्याचे रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्याच्या दिवशी त्याच्याजवळ असलेली इतर हत्यारे आणि वस्तूही पोलिसांना जप्त करायच्या आहेत. तोपर्यंत पोलिस त्याची चौकशी करणं सुरुच ठेवणार आहेत.
हल्ला करणारा आरोपी बांगलादेशचा
हल्ला करणारा आरोपी बांगलादेशचा आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय षडयंत्राची बाबही समोर येत आहे. सरकारी वकिलांनी आरोपींच्या रिमांडसाठी सादर केलेल्या अर्जात आंतरराष्ट्रीय संबंध किंवा कटाबद्दलही न्यायालयात बोलण्यात आले आहे.
न्यायालयानेही याला नकार दिलेला नाही. न्यायाधीशांच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलीस सांगत असल्याने आंतरराष्ट्रीय षडयंत्र असण्याची शक्यता वाटत आहे.
सैफ अली खानला डिस्चार्ज कधी मिळणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानला सोमवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. सोमवारी डॉक्टरांचे पथक सैफच्या प्रकृतीची माहिती घेणार असून त्यानंतर त्याच्या डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल.
सैफची प्रकृती सध्या सुधारतेय. मुंबई पोलिसांनी अद्याप त्याचा जबाब नोंदवलेला नाही. सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबई पोलीस त्याचा जबाब नोंदवू शकतात.
