सैफ अली खान नव्हे तर ‘या’ व्यक्तीकडे सोपवला 1000 कोटींचा शाही वारसा; नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
पतौडी कुटुंबाच्या तब्बल 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या वारशाची जबाबदारी सैफ अली खानवर नाही तर कुटुंबातील दुसऱ्या एका व्यक्तीवर आहे. या व्यक्तीचं नाव वाचून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

अभिनेता सैफ अली खान आणि त्याची बहीण सोहा अली खान हे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरे आहेत. मात्र, त्यांची बहीण सबा अली खान हिने मनोरंजनविश्वापेक्षा वेगळी वाट निवडली आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणाऱ्या सबाच्या खांद्यावर पतौडी कुटुंबाच्या तब्बल 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या वारशाची जबाबदारी आहे. भोपाळच्या ऐतिहासिक संस्थानाशी संबंधित असलेल्या या वारशात केवळ संपत्तीच नाही, तर ऐतिहासिक वास्तू, मशिदी आणि सामाजिक-धार्मिक कार्याशी संबंधित जबाबदाऱ्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, ही जबाबदारी तिचे वडील आणि माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांनी स्वतः तिच्याकडे सोपवली होती.
कोण आहे सबा अली खान?
सबा अली खान ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी आहे. सैफ अली खान आणि सोहा अली खान ही तिची भावंडं आहेत. सैफ आणि सोहा यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली, तर सबाने दागिन्यांच्या डिझाइनिंगसह कुटुंबाच्या ऐतिहासिक वारशाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सबा सहसा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा चित्रपटांच्या चर्चेत फारशी दिसत नाही.
वडिलांनी मुलीवर का दाखवला विश्वास?
सबा ही पतौडी कुटुंबाच्या वारशाशी संबंधित ‘औकाफ-ए-शाही’ या ट्रस्टची मुतवल्ली आहे. मुतवल्ली म्हणजे धार्मिक किंवा धर्मादाय संस्थेच्या मालमत्तेचं व्यवस्थापन आणि देखरेख करणारी व्यक्ती. मन्सूर अली खान पतौडी यांनी सबाकडे ही जबाबदारी सोपवली होती. सबा हिने एका मुलाखतीत सांगितलं की, तिच्या वडिलांना वाटत होतं की ती ही जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळू शकेल. या कामासाठी वेळ देण्याची तयारी आणि व्यवस्थापनाची क्षमता तिच्यात असल्याचा त्यांना विश्वास होता. त्यामुळे ही जबाबदारी तिच्याकडे सोपवण्यात आली.
पहा फोटो-
View this post on Instagram
सबा ज्या वारशाचं व्यवस्थापन करते, त्याचे मूल्य 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं वृत्त आहे. मात्र, या संपूर्ण संपत्तीला तिची वैयक्तिक मालमत्ता समजणे चुकीचे ठरेल. ट्रस्टशी संबंधित मालमत्ता आणि निधीचा वापर त्याच्या उद्देशांनुसार केला जातो. त्यामुळे इतक्या मोठ्या संपत्तीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असली, तरी ती रक्कम सबाच्या वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध आहे, असं नाही. भोपाळच्या नवाबी इतिहासाशी जोडलेल्या या वारशाचं जतन करणं, संबंधित वास्तूंची देखभाल करणं आणि धार्मिक-सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणं हे तिच्या कामाचे महत्त्वाचे भाग आहेत.
एकीकडे सैफ अली खान आणि सोहा अली खान मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत, तर दुसरीकडे सबा शांतपणे कुटुंबाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करत आहे. प्रसिद्धीपासून दूर राहूनही मोठी जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या सबाची ही वेगळी ओळख सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
