
गेल्या आठवड्यात 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ‘सैय्यारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात दिवस उलटले आहेत, तरीसुद्धा त्याची जबरदस्त कमाई सुरू आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तर काही प्रेक्षक त्याच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. परंतु ‘सैय्यारा’च्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. खरंतर एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या चार ते आठ आठवड्यांनंतर तो ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. परंतु आता निर्माते एक नवीन ट्रेंड फॉलो करू पाहत आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट आता तीन महिन्यांनंतर ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. कारण चित्रपटाच्या माऊथ पब्लिसिटीतून निर्मात्यांना आणखी चांगला नफा कमवायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर ओटीटीवर येऊ शकतो. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 170 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर भारताबाहेरही चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. जगभरातील कमाईचा आकडा आता 250 कोटींवर पोहोचला आहे. ‘सैय्यारा’ आता ऑक्टोबर महिन्यातील दिवाळीच्या वीकेंडला ओटीटीवर रिलीज होणार आहे.
‘सैय्यारा’ने पहिल्याच दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. रोमँटिक जॉनरच्या चित्रपटासाठी पहिल्याच दिवशी झालेली ही कमाई सर्वाधिक होती. या चित्रपटातून अभिनेते चंकी पांडे यांचा भाचा आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे. तर अभिनेत्री अनित पड्डाचाही मुख्य अभिनेत्री म्हणून हा पहिला चित्रपट आहे. याआधी तिने ‘सलाम वेंकी’मध्ये छोटी भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावरही सध्या ‘सैय्यारा’चीच चर्चा आहे. या चित्रपटाचे रील्स, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एखाद्या गोष्टीची अधिकाधिक चर्चा होऊ लागली की साहजिकच त्याविषयी कुतूहल निर्माण होतं. हेच कुतूहल आणि माऊथ पब्लिसिटी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून घेऊन येत आहे.