दुर्लक्ष करणं पडू शकतं इतकं महागात; सलमानच्या भावोजीवर आता 2 मोठ्या सर्जरी
अर्पिता खानच्या पतीने सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो पोस्ट करत सर्जरीबद्दलची माहिती दिली. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं, याबद्दलही त्याने सांगितलं आहे. आयुषवर नुकतीच दोन सर्जरी करण्यात आली आहेत.

एखादं दुखणं आपण अंगावर काढतो किंवा क्षुल्लक समजून त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. परंतु हेच दुर्लक्ष करणं कधीकधी महागात पडू शकतं. असाच काहीसा अनुभव अभिनेता सलमान खानचा भावोजी आणि अभिनेता आयुष शर्माला आला आहे. सलमानची बहीण अर्पिता खानचा पती आयुषवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याविषयी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना माहिती दिली. कंबरेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. आयुषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. यामध्ये तो रुग्णालयातील बेडवर असल्याचं पहायला मिळत आहे.
फोटोंच्या कॅप्शनमध्ये आयुषने सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून त्याला त्याच्या कंबरेत वेदना जाणवत होत्या. याची सुरुवात ‘रुसलान’ या चित्रपटाच्या ॲक्शन सीनपासून झाली होती. परंतु आयुषने या वेदनेकडे दुर्लक्ष केलं आणि लपवलं. याविषयी त्याने कोणालाच काही सांगितलं नव्हतं. परंतु एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याचा हा त्रास वाढतच गेला. हे दुखणं इतकं वाढलं की त्याला साधे डान्सचे स्टेप्स, स्टंट्स किंवा स्ट्रेचिंगसुद्धा करता येत नव्हतं. आयुषने ज्या गोष्टीकडे क्षुल्लक दुखणं म्हणून पाहिलं होतं, तीच आता गंभीर बाब झाली होती.
View this post on Instagram
“माझी सर्वांत मोठी चूक म्हणजे मी माझ्या दुखण्याकडे फार लक्ष दिलं नाही किंवा त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. ते आपोआप ठीक होईल, असा मी विचार केला होता. पण त्याच वेदनांमुळे माझ्यावर आता दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या मी त्यातून बरा होतोय”, असं त्याने म्हटलंय. यावेळी आयुषने असंही म्हटलं की चांगलं आरोग्य म्हणजे सिक्स पॅक अॅब्स नाहीत. आपल्या शरीरात नेमकं काय होतंय, आपलं शरीर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय.. याकडे लक्ष देण्यावर त्याने भर दिला. यावेळी आयुषने डॉक्टरांचे, पत्नीचे आणि त्याच्या मुलांचेही आभार मानले.
अर्पिता खानचा पती आयुष शर्माने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला नाही. त्यानंतर तो सलमानच्या ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेल्या वर्षी त्याचा ‘रुसलान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आयुषचे वडील आणि आजोबा राजकारणी आहेत. कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असताना आयुषला अभिनयात करिअर करायचं होतं. मात्र त्याच्या वडिलांचा या निर्णयाला विरोध होता. वडिलांच्या विरोधात जाऊन आयुषने तब्बल 300 ऑडिशन्स दिले होते.
