आधी सीझफायरबद्दल पोस्ट मग लगेच डिलिट..; सलमानवर भडकले नेटकरी

शनिवारी भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीची घोषणा होताच सलमानने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली. नंतर काही तासांतच त्याने ही पोस्ट डिलिट केली. यावरून नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. सलमानच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी सीझफायरबद्दल पोस्ट मग लगेच डिलिट..; सलमानवर भडकले नेटकरी
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 11, 2025 | 9:29 AM

ऑपरेशन सिंदूरनंतर 8 मे पासून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाला शनिवारी विराम देण्याचं ठरवण्यात आलं. भारताने द्विपक्षीय चर्चेनंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अभिनेता सलमान खानने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने शस्त्रसंधीच्या निर्णयाबद्दल सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टवरून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने ही पोस्ट डिलिट केली. तरी सलमानच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल एकही पोस्ट केली नाही, परंतु शस्त्रसंधीबद्दल लगेच पोस्ट लिहिली, यावरून नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

शनिवारी शस्त्रसंधीच्या निर्णयाची घोषणा होताच सलमानने रात्री 9.09 वाजता एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली. ‘शस्त्रसंधीसाठी धन्यवाद’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यानंतर काही वेळातच त्याने ही पोस्ट डिलिट केली. यावरून संतप्त नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सलमान खानचे चित्रपट जितका वेळ थिएटरमध्ये टिकतात, तितकीच वेळ ही शस्त्रसंधी टिकली’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर यांसारख्या सेलिब्रिटींचा पाकिस्तान आणि मध्य पूर्वेत खूप मोठा चाहतावर्ग आहे. आखाती देशांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे. त्यांना माहीत आहे की भारतीय राष्ट्रवादी त्यांना किंवा त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना कोणतंही नुकसान पोहोचवू शकणार नाही. त्यांना त्याची पर्वा नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘गेल्या 15 वर्षांपासून मी सलमानचा चाहता होतो, पण आज सर्वांत जास्त या व्यक्तीचा राग येतोय. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं, तेव्हा एकही पोस्ट लिहिती नव्हती. आता शस्त्रसंधीची घोषणा होताच ट्विट केलं आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच ट्विट डिलिट केलं’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

सलमान खानच्या ट्विटचा स्क्रिनशॉट

दरम्यान शनिवारी रात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संघर्ष असाच सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भविष्यात भारतीय भूमीवरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याकडे युद्ध म्हणून पाहिलं जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.