Salman Khan : सब यहीं मिलेगा.. सलमान खानचं चाहत्यांना दिवाळीआधी गिफ्ट? लाँच केलं स्वत:चं YouTube चॅनेल !
सलमान खानने चाहत्यांसाठी यूट्यूब चॅनल लाँच करून गुड न्यूज दिली आहे. यामुळे चाहते खूप खुश आहेत. 'Being Salman Khan' असं या चॅनेलचं नाव आहे.

अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चाहत्यांसाठी एक गिफ्ट घेऊन आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. सलमानने स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भातील पोस्ट सर्वांसोबत शेअर केलीअसून त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. या चॅनेलवर सलमान त्याच्या पर्सनल लाइफबद्दल किंवा प्रोफेशनल लाइफमधल्या कोणते क्षण दाखवणारा, याचीही चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.
सलमानचं यूट्यूब चॅनल
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमानने नुकतंच त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलची घोषणा केली आहे. अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये तो जुन्या लूकमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने चाहत्यांना आपल्या नव्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती दिली. सलमानने या पोस्टमध्ये, ‘चला, सुरुवातीपासून सुरुवात करूया. माझं अधिकृत यूट्यूब चॅनल! ए टू झेड सर्व काही इथे मिळेल,’ असं म्हटलं आहे. ‘Being Salman Khan’ असं त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव असून, मिळालेल्या माहितीनुसार या चॅनलला आतापर्यंत 15.1 दशलक्ष सबस्क्रायबर्स मिळाले आहेत.
‘बिग बॉस 20’च्या होस्टिंगची जबाबदारी सलमानकडे
दरम्यान, सलमान खान सध्या ‘बिग बॉस 20’मुळेही चर्चेत आहे. या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन सलमान करत असून, होस्ट म्हणून त्याचा हा 15वा सीझन असल्याचं सांगितलं जात आहे. सलमानची खास शैली आणि स्पर्धकांसोबतचा त्याचा संवाद चाहत्यांना नेहमीच आवडतो. त्यामुळे या सीझनमध्येही त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘मातृभूमी’ चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठी अपडेट
सलमान खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘मातृभूमी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘मातृभूमी’ हा चित्रपट भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे वृत्त समोर आले होते. चित्रपटात चिनी नागरिकांचं चित्रण कशा प्रकारे करण्यात आलं आहे, याबाबत केंद्र सरकारला स्पष्टता हवी असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होत असल्याची चर्चा होती.
मात्र, ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या नव्या आवृत्तीबाबत संबंधित मंत्रालय समाधानी असून, चित्रपटाला ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील काही गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली आहेत. मात्र, चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, निर्माते दिवाळीनंतर म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत.
सध्या चित्रपटाची सेन्सॉर प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे. निर्माते लवकरच हा चित्रपट केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) सादर करणार असल्याचं वृत्त आहे. चित्रपटाला वेळेत प्रमाणपत्र मिळाल्यास ‘मातृभूमी’ 13 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्माते अधिकृत घोषणा कधी करतात, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.