
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामती तालुक्यात येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर आज (गुरुवार, 29 जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. कलाविश्वातून अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं इन्स्टाग्रामवर अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी. काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो. त्यातले अजितदाद पवार हे तसे आधार वाटायचे. आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे, खूप त्रास होतोय. गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती. त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो. अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. अजित दादा.. खूप आठवण येत राहील,’ अशा शब्दांत संकर्षणने भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली. बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजितदादांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केलं. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळलं आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली.