हिंदी कलाकारांसमोर का इतका कमीपणा? विचारणाऱ्याला संतोष जुवेकरचं विनम्रपणे उत्तर
अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा'च्या म्युझिक लाँच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. का इतका कमीपणा, असा सवाल एका युजरने केला असता त्याला संतोषने विनम्रपणे उत्तर दिलं.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या म्युझिक लाँचदरम्यानचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हिंदी कलाकारांसमोर का इतका कमीपणा’, असा सवाल एका युजरने केला. त्यावर संतोषनेही त्याला विनम्र उत्तर दिलं. या व्हिडीओमध्ये संतोष जुवेकर हा मंचावर जाऊन विकी कौशल, ए. आर. रहमान, रश्मिका मंदाना आणि लक्ष्मण उतेकर यांची भेट घेताना दिसतोय.
संतोषच्या या व्हिडीओवर एका युजरने ‘का इतका कमीपणा’ असा सवाल केला. त्यावर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘मला पण असंच वाटतं. बाकी प्रादेशिक भाषेमधले कलाकार हे करत बसत नाहीत. ते स्वतःला स्टार समजतात आणि मराठी कलाकार समजत नाहीत.’ नेटकऱ्यांच्या या कमेंट्सवर संतोषने उत्तर दिलं, ‘मित्रा मी स्वतःला स्टार समजण्यापेक्षा ते माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मला एक कलाकार म्हणून समजणं जास्त महत्वाच वाटतं मला. आणि स्टार होणं हे आपल्या कष्टाने आणि त्या कष्टाला फक्त प्रेक्षक नावाच्या देवाच्या आशीर्वाद असावा लागतो.’




View this post on Instagram
म्युझिक लाँचचा व्हिडीओ शेअर करत संतोषने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिलं, ‘काल ‘छावा’ सिनेमाचं म्युझिक अल्बम लाँच होतं. कम्माल… माझ्यासाठी डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा झाला. कारणही तसंच होतं. साक्षात संगीत जगतातला आजचा बादशहा ज्याला म्हटलं जात, तो सम्राट ए. आर. रहमान साहेबांना याची देही याची डोळा अगदी पहिल्या रांगेत बसून जिवंत बघण्याची आणि कानभरून ऐकण्याची संधी मिळाली. मग कार्यक्रम झाल्यावर सर्व टीमला स्टेजवर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं. आधी विश्वासच बसत नव्हता. मग महेश दादाने पाठीवर जोरात थाप मारत मला उठवलं, म्हणाले “अरे जा उठ. तुला बोलावलंय.” काय घडतंय काही कळत नव्हतं.’
‘स्टेजवर गेलो तर रहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं. सरळ त्यांच्या जवळ गेलो. त्यांचं लक्ष नव्हतं, तेव्हा आमच्या विकीभाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रहमान सरांना हाताला धरून वळवून माझी ओळख (तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करून दिली. विकी भाऊ यासाठी लव्ह यू. मी रहमान सरांच्या चरणांना स्पर्श केलाय, त्यांनी माझा हात हातात घेऊन मला शुभेच्छा दिल्यात.. आईईईईई गं! सगळ्या कष्टाचं फळ एकदम देवानं पदरात एकाच फटक्यात घालावं आणि तेही असं भरभरून,’ अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला.