मुंबईत असूनही शाहरुख-सलमान यांची आशा भोसलेंच्या अंत्यविधीला अनुपस्थिती का? कारण आलं समोर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अंत्यविधीला सलमान खान आणि शाहरुख खान अनुपस्थित होते. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सलमान आणि शाहरुख खान यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यविधीला जाणं टाळल्याचं समजतंय.

मुंबईत असूनही शाहरुख-सलमान यांची आशा भोसलेंच्या अंत्यविधीला अनुपस्थिती का? कारण आलं समोर
Shah Rukh Khan, Salman Khan and Asha Bhosle
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2026 | 11:36 AM

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 13 एप्रिल रोजी मुंबईतच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचले होते. पण या सर्वांत आशा भोसले यांच्याशी जवळचे संबंध असूनही अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान अंत्यविधीला अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीवर चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आशा भोसले यांच्या अंत्यविधीला उपस्थित असताना सलमान, शाहरुख त्यापासून का दूर होते, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी सलमान आणि शाहरुख दोघंही मुंबईतच होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी शिवाजी पार्कात अंत्यविधीला येणं टाळलं होतं. याविषयी दोघांच्या टीमकडून कोणतीची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. परंतु हाय प्रोफाइल कार्यक्रमातील गर्दीचं व्यवस्थापन आणि सुरक्षेची चिंता यांमुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. अंत्यविधीला उपस्थित राहता आलं नसलं तरी सलमान खानने सोशल मीडियाद्वारे आशाजींना श्रद्धांजली वाहिली. ‘भारतीय संगीतक्षेत्रासाठी ही सर्वांत मोठी हानी.. आशीजींच्या निधनाचं वृत्त ऐकून माझं मन हेलावलं. एक अनमोल आवाज.. तुमची गाणी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती.

आशा भोसले यांनी सलमानच्या चित्रपटांमधील अनेक गाणी गायली आहेत. ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातील ‘लकी लिप्स’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं. तसंच ‘बीवी नंबर 1’मधील ‘हाय हाय मिर्ची’, ‘जीत’मधील ‘यारा ओ यारा’ या गाण्यांनादेखील आशा भोसले यांनी आवाज दिला आहे. तर शाहरुख खाननेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला होता. ‘आशाताईंच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या आधारस्तंभांपैकी एक होता. पुढील अनेक शतकांपर्यंत तो आवाज जगभरात घुमत राहील. त्यांनी नेहमीच मला आशीर्वाद दिला आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मला त्यांची खूप आठवण येईल’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती.

Follow Us