कोणी विचारलं तर सांगा..; पहलगाम हल्ला, दिल्ली बॉम्बस्फोटाबद्दल काय म्हणाला शाहरुख खान?

26/11 चा दहशतवादी हल्ला, पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि दिल्लीतील बॉम्बस्फोट यांविषयी शाहरुखने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात शाहरुख याविषयी व्यक्त झाला. यावेळी तो म्हणाला, "जेव्हा कोणी तुम्हाला विचारलं की,.."

कोणी विचारलं तर सांगा..; पहलगाम हल्ला, दिल्ली बॉम्बस्फोटाबद्दल काय म्हणाला शाहरुख खान?
Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 23, 2025 | 11:08 AM

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानने मुंबईत आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2025′ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात शाहरुखने दिलेलं भाषण चर्चेत आलं आहे. या भाषणात किंग खानने भारतीय सैनिकांच्या धाडसाचं आणि शौर्याचं तोंडभरून कौतुक केलं. त्याचसोबत त्याने 26/11 च्या दहशतवादी हल्ला, पहलगाम हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील बळींना श्रद्धांजली वाहिली. ’26/11 च्या दहशतवादी हल्ल्या, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि दिल्लीतील मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या आपल्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना माझा आदरपूर्वक सलाम’, असं त्याने म्हटलं.

या कार्यक्रमात शाहरुख पुढे म्हणाला, “आज मला आपल्या देशातील शूर सैनिक आणि जवानांसाठी चार सुंदर ओळी म्हणण्यास सांगण्यात आलं आहे. जेव्हा कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता, तेव्हा अभिमानाने म्हणा, ‘मी देशाचं रक्षण करतो.’ जेव्हा कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही किती कमावता, तेव्हा थोडंसं हसून म्हणा ‘मी 1.4 अब्ज लोकांचे आशीर्वाद कमावतो’ आणि जर त्यांनी तुम्हाला विचारलं की, ‘तुम्हाला कधी भीती वाटत नाही का?’, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पहा आणि म्हणा, ‘जे आपल्यावर हल्ला करतात, त्यांना ती भीती जाणवते.’ आपण सर्वजण एकत्र शांततेनं पावलं टाकुयात. जात, पंथ आणि भेदभाव विसरून मानवतेच्या मार्गावर चालुयात. जेणेकरून आपल्या देशाच्या शांततेसाठी आपल्या वीरांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. जर आपल्यात शांतता असेल तर भारताला कोणतीही गोष्ट हादरवू शकत नाही.” या भाषणाच्या शेवटी शाहरुखने जवानांच्या समर्पणाला आणि भारतीय जनतेच्या सामर्थ्याला सलाम केला.

शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, 2023 मध्ये त्याचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. पुढच्या वर्षी 2026 मध्ये त्याचा ‘किंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खानसुद्धा झळकणार आहे. याशिवाय दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन आणि इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत.