
बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान हा सोशल मीडियाचाही किंग आहे. इन्स्टाग्रामवरील त्याच्या @iamsrk या अकाऊंटला जवळपास 5 कोटी लोक फॉलो करतात. परंतु शाहरुखचं हे पहिलंच इन्स्टाग्राम अकाऊंट नाही. जवळपास 14 वर्षे जुना शाहरुखचा इन्स्टाग्रामवरील पहिला अकाऊंट आता अचानक ॲक्टिव्ह झाला असून नेटकऱ्यांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं आहे. ही खुरापत एका हॅकरने केली असून तो शाहरुखचा तगडा चाहतासुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने या जुन्या अकाऊंटची माहिती दिली होती. शाहरुखने पासवर्ड विसरल्यामुळे इन्स्टाग्रामवर नवीन अकाऊंट सुरू केला होता. हाच नवीन अकाऊंट सध्या सक्रिय आहे. या पोस्टसोबतच संबंधित युजरने जुन्या अकाऊंटचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला होता.
@picsrk असं शाहरुखच्या जुन्या अकाऊंटचं नाव आहे. त्यावेळी इन्स्टाग्राम हा प्लॅटफॉर्म खूपच नवीन होता आणि शाहरुख त्यावर फारसा सक्रिय नसायचा. एकेदिवशी त्या अकाऊंटचा लॉग-इन पासवर्ड विसरल्यानंतर शाहरुखने इन्स्टावर नव्याने अकाऊंट सुरू केला, ज्याचे आता कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. या सर्व चर्चांदरम्यान सर्वजण शाहरुखच्या पहिल्या अकाऊंटचा शोध घेऊ लागले. त्यावर शाहरुखने 2012 मध्ये फक्त तीन पोस्ट टाकले होते. हे आजही पहायला मिळतात. परंतु इतकी वर्षे बंद राहिलेल्या या अकाऊंटच्या स्टोरीमध्ये रविवारी रात्री उशिरा पोस्ट पहायला मिळाली. या स्टोरीमध्ये लिहिलं गेलं, ‘मित्रांनो, मी शाहरुख नाही, मी फक्त कंटाळलो होतो, म्हणून पासवर्डचा शोध घेत होतो. अखेर मी हे अकाऊंट लॉगिन करण्यात यशस्वी ठरलोय. एवढीच गोष्ट आहे.’
शाहरुखच्या या जुन्या अकाऊंटवरून संबंधित हॅकरने अनेकांशी संपर्क साधला आहे. ‘मी शक्य तितक्या लोकांसोबत संपर्क साधला आहे. मी त्यांना शाहरुख नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे. जेणेकरून त्यांच्या खोट्या अपेक्षा निर्माण होणार नाहीत. ज्यांना मी रिप्लाय देऊ शकलो नाही, त्यांची मी माफी मागतो. मी शाहरुख नाही हे जाणूनसुद्धा ज्यांनी माझ्यात रस दाखवला, त्यांचेही मी आभार मानतो.’ शाहरुखच्या या अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट करणाऱ्याने हेसुद्धा लिहिलंय की ‘किंगसाठी आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांचा आदर करण्यासाठी तो या अकाऊंटला असाच सोडून जात आहे, जसा तो आधीपासून होता.’ यावर अद्याप शाहरुखच्या टीमकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. त्याची टीम हे अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी काही प्रयत्न करणार का, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.