Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात 2 साप शिरल्याने खळबळ; 8 फुटांचा धामण सुरक्षित रेस्क्यू, दुसरा पसार
Mannat : शाहरुख खानच्या मन्नत बंगला परिसरात दोन साप आढळले. सर्पमित्राने यातील एका सापाचं सुरक्षितरित्या रेस्क्यू केलं असून दुसरा साप मात्र पसार आहे. यामुळे सुरक्षारक्षकांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात सोमवारी रात्री दोन साप आढळले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 17 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास साप फिरत असल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना फोनवरून मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड आणि मुंबई रेंज ऑफिस, ठाणे इथल्या कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच विक्की दुबे घटनास्थळी दाखल झाले. मन्नत बंगल्याच्या पटांगणात एका शिडीखाली पाहणी केली असता धामण जातीचा सुमारे आठ फूट लांबीचा बिनविषारी साप आढळून आला. हा साप वेटोळे घालून बसला होता. सर्पमित्र विक्की यांनी त्याला कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू केलं. मात्र परिसरात लोकांची चाहूल लागताच दुसरा साप तिथून निसटून गेला. हा दुसरा साप कुठे गेला, याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र बराच शोध घेतल्यानंतरही तो साप आढळून आला नाही.
मन्नत बंगल्याच्या परिसरात दोन साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षक आणि बंगल्यातील लोकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र रेस्क्यू करण्यात आलेला साप बिनविषारी धामण असल्याचं समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सापाला रेस्क्यू केल्यानंतर सर्पमित्रांनी उपस्थितांना सापाबाबत माहिती देत घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगितलं. धामण हा बिनविषारी साप असून तो प्रामुख्याने उंदीर, बेडूक यांसारख्या प्राण्यांवर उपजीविका करतो. त्यामुळे मानवी वस्तींमध्ये तो आढळला तरी त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षितपणे रेस्क्यू करणं महत्त्वाचं आहे.
मन्नसारख्या गजबजलेल्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरात साप आढळल्याने या घटनेनं काही काळ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. धामण हा वेगाने हालचाल करणारा साप असल्याने तो माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला पकडताना विशेष काळजी घ्यावी लागते. रेस्क्यू करण्यात आलेल्या सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं. मात्र दुसरा साप अद्यापा सापडलेला नसल्याने मन्नत परिसरातील सुरक्षारक्षकांकडून खबरदारी घेतली जात असल्याचं कळतंय.