माझ्यावर जळू नका..; सर्वाधिक मानधन घेण्यावरून मराठी अभिनेता स्पष्टच म्हणाला
या अभिनेत्याने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या मालिकेसाठी त्याला सर्वाधिक मानधन मिळालं आहे. त्यावरून होणाऱ्या चर्चांवर अखेर अभिनेत्याने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर जळू नका, असंच त्याने म्हटलंय.

‘तुम से तुम तक’ या मालिकेतून अभिनेता शरद केळकरने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय. या मालिकेसाठी त्याने टेलिव्हिजनवरील कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन घेतल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांवर आता शरदने प्रतिक्रिया दिली आहे. “होय, मी सर्वाधिक मानधन घेतलंय. यात चुकीचं काय आहे? जर एखादी व्यक्ती चांगलं कमावत असेल, तर लोकांनी त्यावर खुश व्हायला हवं, जळफळाट करू नये”, असं तो म्हणाला. त्याचप्रमाणे एखाद्या अभिनेत्याचं टेलिव्हिजनकडे पुन्हा वळणं हे यशाचं चिन्ह असल्याचंही त्याने म्हटलंय.
IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद म्हणाला, “जर एखादा अभिनेता पुन्हा टेलिव्हिजनकडे वळत असेल, तर याचा अर्थ असा आहे की त्यांची किंमत अजूनही आहे. कोणीही तुम्हाला जुन्या कामासाठी बोलवत नाही. तुम्हाला काहीतरी नवीन द्यावंच लागतं. मला ‘तुम से तुम तक’ या मालिकेची स्क्रिप्ट खूपच आवडली होती. निर्मात्यांनी मला आधी जानेवारीत त्याविषयी विचारलं होतं. पण तेव्हा शेड्युलचा गोंधळ असल्याने मी त्यांना नकार दिला होता. नंतर मार्चमध्ये पुन्हा त्यांनी मला ऑफर दिली, तेव्हा मी दुसऱ्यांदा विचार करण्याचा निर्णय घेतला.”
View this post on Instagram
“या मालिकेत दोन वेगळे विश्व दाखवण्यात आले आहेत. दोन्ही कलाकारांमधील वर्कलोडसुद्धा संतुलित आहे. हे टिपिकल मालिकांसारखं नाहीये. याच्यासाठी शूटिंगचे फार दिवसही लागत नाहीत. कथासुद्धा चांगली आहे, शेड्युल मॅनेज करता येऊ शकतं आणि झी वाहिनीवर ही मालिका आहे… या सर्व कारणांमुळे मी होकार दिला. झी वाहिनीवरच माझी पहिली मालिका प्रसारित झाली होती. त्यामुळे माझ्यासाठी ही घरवापसी आहे”, अशा शब्दांत शरदने भावना व्यक्त केल्या आहेत.
या मालिकेत 19 वर्षांची अनू आणि 46 वर्षांचा आर्यवर्धन यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. वयातील या फरकामुळे मालिकेला सुरुवातीला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. यामध्ये शरद केळकरसोबत अभिनेत्री निहारिका चौक्सी मुख्य भूमिकेत आहे. मालिकेच्या कथानकाबाबत अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. 27 वर्षांचं अंतर असताना शरद आणि निहारिका यांच्यात रोमँटिक नातं दाखवल्याने प्रेक्षक चक्रावले होते. ‘ही लोकं काहीही दाखवतायत. 19 वर्षांची मुलगी आणि 46 वर्षांचा मुलगा.. हे जरा अतिच आहे. मुलाचं वय 35 पर्यंत असतं तरी ठीक असतं. ही जोडी अजिबात आवडली नाही’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.
