मराठी भाषेला भीतीच्या छायेत..; सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाची पोस्ट, गर्लफ्रेंड जान्हवी कपूरचीही प्रतिक्रिया
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाने मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. भीतीच्या छायेत भाषेला जिवंत ठेवू शकत नाही, असं त्याने म्हटलंय. जान्हवी कपूरने त्याची ही पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाला राजकीय वळण लागलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला असताना आता सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिखरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘मराठी अस्मिता ही सहभागाने चमकू द्या, धमक्यांनी नाही. मराठी भाषेचं शस्त्र बनवून नाही तर ती साजरी करून तिचं रक्षण करुयात’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
शिखर पहाडियाची पोस्ट-
‘अस्मिता, एकमेकांमधील ओळख, स्वाभिमान आणि ओळखीची वाढना वाढली पाहिजे, पण ती फूट पाडणारी नसावी. आपण भारतात कुठेही राहत असो किंवा कुठलीही भाषा बोलत असो, त्यातून आपल्याला अभिमान मिळावा, पूर्वग्रह नाही. मराठी अस्मिता खरी आहे. ते भावनिक आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीत खोलवर रुजलेलं आहे. मी सोलापूरचा असल्याने, ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजतो. भाषा आपल्याला घडवते, भाषेनं आपल्या राज्यांना, कथांना घडवलंय, आपल्याला कविता, गाणी आणि क्रांती दिली आहे. मराठी याला अपवाद नाही. आपल्या इतर सर्व भाषांप्रमाणेच मराठी भाषासुद्धा जपली पाहिजे, संरक्षित केली पाहिजे आणि पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवली पाहिजे’, असं त्याने म्हटलंय.
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘सोलापूरमधील कित्येक लोक दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाताला कामासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी जातात. त्यांना तिथे स्वागतार्ह वाटलं नाही आणि त्यांच्या भाषेसाठी अपमान करण्यात आला तर कल्पना करा कसं वाटेल? तेव्हा आपण काय बोलणार? जेव्हा लोक त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर जाऊन संघर्ष करत आहेत, मेहनत करत आहेत, तेव्हा हिंसेच्या मार्गाने भाषा लादणं अस्वीकार्य आहे. मुंबईत लोक हिंदी, तमिळ किंवा गुजराती बोलतात.. ही काही शोकांतिका नाही. पण हे मराठीसाठी धोकादायक आहे असा विश्वास ठेवणं खरी शोकांतिका आहे. आपण भीतीच्या छायेत भाषेला जिवंत ठेवू शकत नाही.’
View this post on Instagram
‘मुंबई, महाराष्ट्र आणि भारत अशा सर्वांचा आहे, जे सन्मानाने जगतात, प्रामाणिकपणे काम करतात आणि करुणा बाळगतात. त्यांची भाषा मग कोणतीही असो. आपल्या मराठी अस्मितेला धमकी देऊन नव्हे तर सर्वांचा समावेश करून चमकू द्या. मराठीला शस्त्र बनवून नव्हे तर साजरं करून तिचं रक्षण करुयात’, असं त्याने या पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.
शिखरची ही पोस्ट त्याची गर्लफ्रेंड जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत पाठिंबा दिला. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
