त्या दोघांना गाडीमध्ये पाहिलं अन्..; श्वेता तिवारीवर पूर्व पतीकडून गंभीर आरोप
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. श्वेताचा पूर्व पती राजा चौधरीने तिच्यावर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले आहेत. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील अभिनेत्यासोबत त्याने श्वेताचं नाव जोडलं आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिने ‘बिग बॉस’ या शोमध्येही भाग घेतला होता. सलमान खानच्या या शोची ती विजेती ठरली होती. श्वेता तिच्या कामामुळे प्रसिद्धीझोतात असली तरी अनेकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. श्वेताने तिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तिने दोन वेळा लग्न केलं, परंतु तिची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली. श्वेताने अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. आता घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत राजाने श्वेतावर काही गंभीर आरोप केले आहेत. श्वेताचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, असा दावा त्याने केला आहे.
राजा चौधरीने पूर्व पत्नी श्वेता तिवारीबद्दल एका मुलाखतीत दावा केला की, तिने त्याची फसवणूक केली होती. विवाहित असूनही तिचे ‘कसौटी जिंदगी की’मधील सहअभिनेता सीझेन खानसोबत प्रेमसंबंध होते, त्याची माहिती घटस्फोटादरम्यान मिळाली, असं तो म्हणाला. ‘हिंदी रश’ला दिलेल्या या मुलाखतीत राजा असंही म्हणाला की त्यांचा घटस्फोट खरंतर 2003 मध्येच व्हायला हवा होता. “गाडीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे होती, म्हणून ते द्यायला मी श्वेताच्या सेटवर गेलो होतो. तिथे जाऊन पाहिलं की श्वेता सीझेन खानच्या ड्राइव्हरसोबत दुसऱ्या गाडीने येत होती. त्या गाडीमध्ये तिच्यासोबत सीझेनसुद्धा होता”, असं तो म्हणाला.
View this post on Instagram
राजाने असाही दावा केला की सकाळपासून शूटिंग सुरू असल्याचं श्वेताने त्याला सांगितलं होतं. परंतु राजा सेटवर पोहोचेपर्यंत ती सेटवर गेलीच नव्हती. “सगळं डोळ्यांदेखत पाहूनसुद्धा त्यावेळी माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी तिला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल विचारू शकेन. मी जेव्हा कधी श्वेताला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने माझ्यावर दारुडा असल्याचा आरोप केला. मी फक्त माझ्या मुलीखातर श्वेताचे टोमणे सहन केले आहेत. पलकसाठी मी गप्प होतो”, असं राजाने सांगितलं.
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी 1998 मध्ये लग्न केलं. या दोघांना पलक तिवारी ही मुलगी आहे. 2007 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्याच्या पाच वर्षांनंतर 2012 मध्ये दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. घटस्फोटादरम्यान श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. राजाला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं. परंतु तिचं हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. श्वेताने अभिनववरही मारहाणीचे आरोप केले होते.
