सचिन, तुला आमच्या #मीटू कथा दिसत नाहीत का? : सोना मोहापात्रा

सचिन, तू ज्या इंडियन आयडल शोचं कौतुक केलंस, त्याचेच परीक्षक अनू मलिकविरोधात असलेले 'मी टू'चे गंभीर आरोप तुला दिसत नाहीत का? असा प्रश्न सोना मोहापात्राने विचारला

सचिन, तुला आमच्या #मीटू कथा दिसत नाहीत का? : सोना मोहापात्रा

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्रा हिने ट्विटरवरुन थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाच लक्ष्य केलं आहे. ‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोमधील गुणी कलाकारांचं कौतुक करणाऱ्या सचिनला सोनाने याच कार्यक्रमाच्या परीक्षकावर असलेले #मीटूचे आरोप दिसत नाहीत का? असा सवाल (Sona Mohapatra on Sachin Tendulkar) विचारला.

सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमधील गायकांचं कौतुक करणारा ट्वीट सचिनने दोन दिवसांपूर्वी केला होता. ‘इंडियन आयडलमधील तरुणांचं टॅलेंट, हृदयाला भिडणारे आवाज आणि त्यांच्या संघर्षकथा ऐकून भारावून गेलो. राहुल, चेल्सी, दिवस आणि सनी हे देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आले आहेत. मात्र अडथळे असतानाही संगीताविषयी त्यांची निष्ठा सारखीच आहे. ते लांबचा पल्ला गाठतील, याविषयी मला खात्री आहे’ असं लिहित सचिनने चौघांचे फोटो ट्वीट केले होते.

सोना मोहापात्राने सचिनचा ट्वीट ‘कोट’ करत त्याला काही प्रश्न विचारले. ‘प्रिय सचिन, तू ज्या इंडियन आयडल शोचं कौतुक केलंस, त्याचेच परीक्षक अनू मलिकविरोधात त्याच शोच्या माजी निर्मात्यासह काही महिला आणि अल्पवयीन मुलींनी गेल्या वर्षी केलेल्या #मीटू आरोपांची तुला कल्पना नाही का? त्यांच्या हालअपेष्टा कोणाच्याच मनाला स्पर्शून गेल्या नाहीत का?’ असा प्रश्न सोनाने विचारला आहे.

सोनाच्या संतापाला गायिका नेहा भसीनने ट्विटरवरुन अनू मलिकवर केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. 21 व्या वर्षी आपल्यासोबत अनू मलिकने गैरवर्तन केलं होतं, असा आरोप नेहाने केला होता. सोनाने नेहा, गायिका श्वेता पंडित, अनू मलिकच्या फॅमिली डॉक्टरची मुलगी अशा अनेक जणींनी केलेल्या आरोपांविषयी ट्विटरवर वाचा फोडली आहे. गायक सोनू निगमने अनू मलिकची बाजू घेतल्याबद्दलही सोनाने चीड (Sona Mohapatra on Sachin Tendulkar) व्यक्त केली.

सोना मोहापात्राच्या ट्वीटवरुन नेटिझन्सनी मात्र तिलाच धारेवर धरलं आहे. या प्रकरणाचा सचिन तेंडुलकरशी काहीच संबंध नाही, त्याला यामध्ये खेचण्याची काहीच गरज नाही. तो इंडियन आयडलमधील कलावंतांचं कौतुक करुच शकतो, अशा शब्दात सोनालाच गप्प करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *