राज ठाकरे यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोनाली बेंद्रे स्पष्टच म्हणाली..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सोनाली बेंद्रेनं मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या कुटुंबाशी कसं नातं आहे, याविषयीही तिने सांगितलं.

सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही तिचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. चित्रपटांमध्ये पूर्णपणे सक्रिय असताना सोनालीचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं. तिने निर्माता गोल्डी बहलशी लग्न करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमातील सोनालीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा दिसले होते. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांना सोनाली बेंद्रेशी लग्न करायचं होतं, परंतु ते शक्य झालं नव्हतं, अशी ही चर्चा होती. या चर्चांवर अखेर सोनालीने मौन सोडलं आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनालीला त्या व्हायरल व्हिडीओवरून प्रश्न विचारण्यात आला होता. “त्या व्हिडीओमध्ये तुम्ही राज ठाकरेंकडे वळता. नंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली की वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांचं सोनालीवर क्रश होतं”, असं तिला विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना सोनाली म्हणाली, “तसं खरंच होतं का?… मला तर शंका वाटते.” त्या व्हायरल क्लिपबद्दल सोनाली पुढे सांगितलं, “मी तिथे माझ्या बहिणीशी बोलत होती, जी तिथेच उभी होती. मला असं वाटतं, जेव्हा लोक अशा पद्धतीचं काही बोलतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही. यात कुटुंबही सहभागी असतात आणि इतर लोकसुद्धा त्यात सहभागी असतात.”
View this post on Instagram
या दोन्ही कुटुंबांमध्ये खूप जुनं नातेसंबंध असल्याचंही सोनालीने स्पष्ट केलं. “माझे भावोजी क्रिकेटर आहेत आणि ते राजच्या चुलत बहिणीच्या पतीसोबत क्रिकेट खेळायचे. ते नेहमीच सोबत खेळायचे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीची सासू, हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या, ज्या रुईया कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचर शिकवायच्या. तिथेच माझंही शिक्षण झालं होतं. त्यामुळे ते सर्वजण एकमेकांना ओळखायचे. राज यांची पत्नी शर्मिली, त्यांची सासू आणि माझी मावशी यांच्यातही खूप चांगली मैत्री आहे. शर्मिला यांच्या आईने मला दहा दिवसांपर्यंत त्यांच्याकडे ठेवलं होतं. कारण तुम्हाला माहीतच असेल की ती माझ्या आईची छोटी बहीण आहे, माझी मावशी आहे”, असं ती पुढे म्हणाली.
सोनालीने असंही सांगितलं की ती राज ठाकरे यांना यापेक्षा अधिक ओळखत नाही. कारण ती महाराष्ट्रात केवळ वर्षातून दोन वेळाच उन्हाळ्याच्या सुट्टीत यायची. त्याचप्रमाणे राजकारणात प्रवेश करण्याचाही कोणताही प्लॅन नसल्याचं सोनालीने या मुलाखतीत स्पष्ट केलं. राजकारणात जाण्यासाठी जाड कातडी करावी लागते, जे मी करू शकत नाही, अशी तिने प्रतिक्रिया दिली.
