
गरिबांचा कैवारी सोनू सूद, अभिनेत्री उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा आणि नेहा शर्मा यांसारखे सेलिब्रिटी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर बेटिंग अॅप “वनएक्सबेट” प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपी असलेल्या अनेक चित्रपट कलाकारांच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याची माहिती देखील समोर येत आहे. ईडीने तपास तिव्र आणि कसून सुरु केला आहे. ज्यामध्ये सोनू सूद, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा आणि नेहा शर्मा यांसारख्या प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मालकीच्या एकूण 7.93 कोटी रुपयांचा संपत्ती जप्त केली आहे.
ईडीने सोनू सूदची 1 कोटी रुपये, मिमी चक्रवर्तीची 59 लाख रुपये, नेहा शर्माची सुमारे 1.26 कोटी रुपये, अंकुश हाजरा याची 47.20 लाख रुपये आणि उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांची 2.02 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अशाप्रकारे, काही क्रिकेटपटूंच्या मालमत्तेसह, आतापर्यंत ईडीने 7.93 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे.
संबंधित प्रकरण ‘OneXBet’ आणि त्याच्या इतर ब्रँडशी संबंधित आहे, जे कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय भारतात ऑनलाइन बेटिंग व्यवसाय चालवत होते. ईडीच्या तपासात असं दिसून आलं आहे की, हे अॅप भारतात त्याच्या प्रमोशनसाठी अनेक सेलिब्रिटींचा वापर करत होतं. सेलिब्रिटींनी जाणूनबुजून परदेशी कंपन्यांशी जाहिरातींचे करार केले, ज्यामुळे त्यांनी बेकायदेशीर कमाई लपवण्याचा प्रयत्न केला.
ईडीला असं आढळून आलं की, OneXBet आणि त्याच्याशी संबंधित ब्रँड सोशल मीडिया, ऑनलाइन व्हिडिओ, प्रिंट मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे भारतात वापरकर्त्यांना बेटिंगसाठी आकर्षित करत आहेत. या प्लॅटफॉर्म्सनी हजारो बनावट आणि भाड्याने घेतलेली बँक खाती तयार केली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले. ईडीने देशातील चार प्रमुख पेमेंट गेटवेवर छापे टाकले आणि 60 हून अधिक बँक खाती फ्रिज केली आहेत.